राजापुरातील वादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, दोन कोटी नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:30 IST2021-05-23T04:30:48+5:302021-05-23T04:30:48+5:30
राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...

राजापुरातील वादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, दोन कोटी नुकसान
राजापूर : तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका राजापूर तालुक्याला बसला असून, तालुक्यातील घरे, गोठे, फळ बागायतींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यात या चक्रीवादळात २३७ गावे बाधित झाली असून, यात १९१२ घटनांचे पंचनामे करण्यात आले. त्यामध्ये एकूण दोन कोटी तीन लाख दहा हजार ४१५ रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका समुद्रकिनाऱ्यावरील १३ गावांसह तालुक्यातील २३७ गावांना बसला आहे. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, तीनजण किरकोळ जखमी होऊन त्यांना १२,९०० रुपयांचा फटका बसला. यामध्ये जनावरांना काेणतीही हानी पाेहाेचली नाही.
या चक्रीवादळाचा फटका राहत्या घरांना बसला. यामध्ये सहा घरे माेठ्या प्रमाणात बाधित झाली. त्यामध्ये चार पक्क्या घरांचे मिळून सात लाख ८० हजार, दोन कच्ची घरे बाधित होऊन त्यांचे तीन लाख २५ हजारांचे नुकसान झाले, तर ६३८ पक्की घरे अंशता बाधित होऊन चार लाख १४ हजार, तर २५५ कच्ची घरे बाधित होऊन १७ लाख ६० हजारांचे नुकसान झाले. तर यामध्ये ४७ गोठ्यांची पडझड होऊन एक लाख १३ हजार ५०५ रुपयांचे नुकसान झाले. तसेच १७ दुकानदार टपरीधारक यांचे एक लाख १५ हजार २५०, तर भांडी, कपडे यांचे सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
तर ८ अंगणवाडी इमारतींचे मिळून १६ लाख ९ हजार व ५ आरोग्य केंद्रांचे ८ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे, तर ७ आरोग्य उपकेंद्रांचे एक लाख ८६ हजार रुपयांचे नुकसान झाले. एका साकवाचे नुकसान होऊन ३ लाख ५० हजारांचे, तर २ पिकअपशेड बाधित होऊन एक लाखाचे, तर दोन रस्ते वाहून गेल्याने एक कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये ७९२ फळ झाडे व जंगली झाडे बाधित होऊन ४७ लाख ८४ हजार १६० रुपयांचे नुकसान झाले. ५० जिल्हा परिषद शाळा इमारतींचे नुकसान होऊन ८ लाख ६९ हजार रुपयांचे, तर ६ माध्यमिक शाळांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. तर १२ ग्रामपंचायत मालमत्तेचे ७ लाख ७० हजार रुपयांचे, तर पशुसंवर्धन कार्यालयाचे ५ हजार रुपयांचे, तर १० हाेड्या व जाळी बाधित होऊन त्यांचे सुमारे ३ लाख १४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडून मदत जाहीर झाल्यावर आपद्ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.