मरणोत्तर देहदानासाठी जनजागृती
By Admin | Updated: September 8, 2015 22:23 IST2015-09-08T22:23:50+5:302015-09-08T22:23:50+5:30
नारायण सावंत : नेत्रदान, चमडीदान, देहदानासाठी भरला अर्ज

मरणोत्तर देहदानासाठी जनजागृती
पाली : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावातील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच नारायण शिवराम सावंत यांनी मरणोत्तर नेत्रदान, चमडीदान, देहदानसाठी स्वत:चा अर्ज भरला आहे. याविषयी आपण जनजागृती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वत:चे शरीर दुसऱ्याच्या स्वाधीन करण्यास कोणी तयार नसतो. त्यातही त्यांचे नातेवाईक अशा गोष्टीचे कधीच समर्थन करत नाहीत. मात्र, या सर्वाला बगल देत नाणीज येथील नारायण सावंत यांनी नवा आदर्श ठेवला आहे. केवळ नेत्रदान नव्हे; तर चमडीदान आणि देहदानाचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. नारायण सावंत हे ८२ वर्षांचे असून, अजूनही ते एखाद्या तरुणाप्रमाणे जिद्दीने सामाजिक कार्य करीत आहेत. मरणोत्तर नेत्रदान, चमडीदान, देहदान यासाठी नारायण सावंत यांनी शरीररचनाशास्त्र विभाग भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, सावर्डे - चिपळूण येथे स्वत:चा अर्ज भरुन पाठविणार आहेत, अशी माहिती देऊन इतर दहाजणांचा अर्जही लवकरच पाठवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
ते म्हणाले की, आपल्या देशात लाखो लोक अंध आहेत, त्याचबरोबर अनेकजण अपंग आहेत. त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्याचप्रमाणे देहदान, चमडीदान, नेत्रदान करणे, याबाबत सामाजिक पातळीवर जनजागरण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. आपले उर्वरित आयुष्य आपण याबाबत जनजागृती करण्यास घालविणार आहोत, असे त्यांनी सांगितले. सावंत हे नाणीज गावचे सरपंच असताना शासनाच्या विविध योजना त्यांनी राबवून जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला. शासनाच्या विविध योजनेचा लाभ जनतेला कसा होईल, याबाबत त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. सावंत आज ८२ वर्षांचे असूनही सामाजिक कार्य करीत आहेत. (वार्ताहर)
स्वत:चा व इतर १० जणांचाही फॉर्म सावर्डे येथील शरीररचना शास्त्र ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे लवकरच पाठविणार आहे, असे नारायण सावंत यांनी सांगितले. नारायण सावंत यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिसरातून स्वागत होत आहे. आपल्याबरोबर इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.