आरवली ते येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग कामासाठी अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:11+5:302021-03-23T04:33:11+5:30
देवरुख : तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामाला अनुदान मिळत नसल्याने काम ...

आरवली ते येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग कामासाठी अनुदान द्या
देवरुख : तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या कामाला अनुदान मिळत नसल्याने काम रखडलेले आहे. या कामासाठी निधी मिळण्यासाठी संतोष येडगे यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे त्यांनी या कामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
आरवली ते येडगेवाडी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एस. टी. बसचे टायर, बाॅडीकंडिशन आणि स्प्रिंगा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, एस. टी. बसेस बिघाडाच्या प्रमाणात वाढ होत आहे. एस. टी. बसेस वारंवार ब्रेकडाऊन होत असल्याने आधी रस्ता दुरुस्त करावा नंतरच एस. टी. बसेस सुरू कराव्यात अशी सूचना एस. टी. प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयाला केली आहे. जोपर्यंत रस्ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत या मार्गावरील एस. टी. बससेवा सुरू ठेवणे जिकिरीचे होत असल्याचे मत एस. टी. प्रशासनाने नोंदविले आहे.
आरवली ते कुचांबे या १५ किलाेमीटर कामाला सन २०१८-१९ अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली आहे. तर कुचांबे ते येडगेवाडी या मार्गावरील १७ ते २५.५०० किलाेमीटर कामाला विशेष दुरुस्ती लेखाशिर्षाअंतर्गत २०१८-१९ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही कामांना अनुदान प्राप्त होत नसल्याने कामे रखडली आहेत. वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल यांची भेट घेऊन अनुदान उपलब्धतेची मागणी केल्याचे संतोष येडगे यांनी सांगितले.
काेट
संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग कामासाठी सद्यस्थितीत २.४७ कोटी रुपये अनुदानाची आवश्यकता आहे. या कामांना अनुदान मिळावे म्हणून वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल हे सकारात्मक असून, योग्य ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
- संतोष येडगे,
उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत राजीवली ता. संगमेश्वर