प्रकल्पग्रस्तांचा निदर्शनाचा इशारा

By Admin | Updated: October 16, 2015 22:47 IST2015-10-16T21:11:42+5:302015-10-16T22:47:21+5:30

विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने विविध नेते व प्रशासकीय अधिकारी यांना २००८ पासून सातत्याने विनंत्या करत आहोत.

Protest demonstration warning | प्रकल्पग्रस्तांचा निदर्शनाचा इशारा

प्रकल्पग्रस्तांचा निदर्शनाचा इशारा

चिपळूण : गडनदी प्रकल्पग्रस्त पाचांबे पुनर्वसन खेरशेत समितीच्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याची भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत दि. २ नोव्हेंबर रोजी निगुडकर यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
चिपळूण येथे शुक्रवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या कार्यालयात पाचांबे प्रकल्पग्रस्तांची पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीची माहिती देण्यात आली. आपल्या विविध मागण्यांसाठी आपण सातत्याने विविध नेते व प्रशासकीय अधिकारी यांना २००८ पासून सातत्याने विनंत्या करत आहोत. परंतु, आमचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. उपजिल्हाधिकारी निगुडकर हे एफ ए कन्स्ट्रक्शनचे मालक म्हणून बैठकीत वागत होते. प्रकल्पग्रस्तांना ते योग्य उत्तरे देत नव्हते. कोयना धरणातील प्रकल्पग्रस्त जशी भीक मागत आहेत तशी तुमची स्थिती झालेली नाही, असे सांगून त्यांनी प्रकल्पग्रस्तांची अवहेलना केली. त्यामुळेच ही निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी आपला प्रयत्न आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी खेरशेत येथे १८० भूखंड मंजूर झाले. त्यातील ९० घरे तयार आहेत. प्रकल्पग्रस्तांना अद्याप घरपट्टी नाही, जागा त्यांच्या नावावर नसल्याने कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. शिवाय साधे कर्जही काढता येत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट सुरु आहे. आम्ही खेरशेत ग्रामपंचायतीत समाविष्ट व्हावे असे आम्हाला सांगण्यात आले. परंतु, संपूर्ण गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत हवी असा निर्णय झाला आहे, असे अनिल कदम यांनी सांगितले. याबाबतही निगुडकर यांनी त्यांना आवाज बंद कर असे सुनावले.
प्रकल्पग्रस्तांकडे शासनाचे दाखले असूनही त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आपल्या विविध मागण्या प्रकल्पग्रस्तांनी विस्ताराने मांडल्या. यावेळी निगुडकर यांनी रास्ता रोको किंवा आंदोलनाची स्टंटबाजी मला चालत नाही, असे सुनावले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अधिकच आक्रमक झाले आहेत. यावेळी शांताराम बल्लाळ, सुभाष बल्लाळ, महेश सावंत, गणेश निकम, पंकज सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)

उपजिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. निगुडकर यांनी माफी मागावी अशी त्यांची अपेक्षा आहे. माजी खासदार नीलेश राणे यांना निवेदन दिल्यानुसार राणे यांच्या नेतृत्वाखाली निगुडकर यांच्या घरासमोर निदर्शने केली जाणार आहेत.

Web Title: Protest demonstration warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.