प्रस्ताव अजून पडून : राजापुरातील गोदामांच्या इमारतींना प्रतीक्षा
By Admin | Updated: December 12, 2015 00:18 IST2015-12-11T22:09:05+5:302015-12-12T00:18:26+5:30
जीर्णावस्थेतील पुरातन इमारतींना ‘अच्छे दिन’ केव्हा?

प्रस्ताव अजून पडून : राजापुरातील गोदामांच्या इमारतींना प्रतीक्षा
राजापूर : राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्या सूचनेनंतर राजापुरातील गोदाम इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अनेक दिवस लोटले आहेत. त्याबाबत काहीच हालचाल न झाल्याने अत्यंत जीर्णावस्थेत गेलेल्या पुरातन इमारतींना अच्छे दिन केव्हा प्राप्त होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. राजापूर शहरातील पंचायत समितीच्या कार्यालयालगत पुरवठा विभागाची दोन गोदामे आहेत. या इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून, कशाबशा तग धरून उभ्या आहेत. दारे, खिडक्यांची दुरवस्था बनली आहे. त्या इमारतींत विजेची सोय नसल्याचे विदारक वास्तव राज्याचे अन्न पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी एके दिवशी रात्री अचानक दिलेल्या भेटीदरम्यान दिसून आले. त्यावेळी त्यांनी इमारतींची परिस्थिती पाहून आश्चर्य व्यक्त केले.
एवढ्या गोदामातीत विदारकता पाहून त्यांनी संबंधितांना फैलावर घेतले. त्यांनी तत्काळ या इमारतींच्या दुरुस्तींचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचनादेखील दिली होती. त्यानुसार राजापुरातून तशा स्वरुपाचा समारे दोन कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करून शासनाकडे पाठवून देण्यात आला, त्याला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पुढील काहीच कार्यवाही झालेली नाही. ही गोदामे जुनी असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पण शासनाला त्याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही हे प्रस्ताव धूळखात पडत असल्याचे आता दिसत आहे. या कामाला मुहूर्त कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.
पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी प्रस्ताव मागितल्यानंतरही कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे जनमानसातून आता या गोदामांना अच्छे दिन केव्हा प्राप्त होणार, याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)