तत्कालीन सरपंचांबाबत अपात्रतेचा प्रस्ताव
By Admin | Updated: December 25, 2015 00:41 IST2015-12-24T21:44:44+5:302015-12-25T00:41:53+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण विभाग आयुक्तांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, अनिल अनंत खडपेकर यांनी सीआरझेड क्षेत्रात बांधकाम परवानगी देणे,

तत्कालीन सरपंचांबाबत अपात्रतेचा प्रस्ताव
गुहागर : अंजनवेल येथील ग्रामस्थ अनिल खडपेकर यांना गावठाण क्षेत्रात व सीआरझेड क्षेत्रात येत असलेल्या जागेत सचिव यांचे मत डावलून परवानगी दिल्याचा ठपका तत्कालीन सरपंच यशवंत बाईत व सदस्य यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनिमय १९५८चे कलम ३९प्रमाणे अपात्रतेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती तक्रारदार नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी दिली.बायोगॅस प्रकल्पाचा एकदा लाभ घेतला असताना पुन्हा प्रस्ताव करणे, याआधीच्या सरपंचांच्या कारकिर्दीत कामे झाली नसताना निधी खर्ची पडलेला दाखवण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतरही संबंधितांवर रितसर कार्यवाही न करता हे पैसे भरून घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणे, अशा गोष्टी बाईत यांनी केल्याचा आरोप नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी केला आहे. अनिल खडपेकर यांना सीआरझेड व गावठाण क्षेत्रात येणाऱ्या जमिनीत घर बांधण्याची परवानगी दिली, याबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबतचा अहवाल तयार करून त्यांनी पाठवला आहे. सरपंच यशवंत बाईत व सर्व सदस्यांवर अपात्रतेचे स्पष्ट संकेत अहवालात देताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण विभाग आयुक्तांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, अनिल अनंत खडपेकर यांनी सीआरझेड क्षेत्रात बांधकाम परवानगी देणे, यामध्ये मासिक सभेमध्ये सचिव (ग्रामसेवक) यांनी त्याचे स्पष्ट मत दिले. त्यात घर गावठाण क्षेत्रात असल्याने महसूल खात्याकडील परवानगीखेरीज परवानगी देणे शक्य नाही. याकडे दुर्लक्ष करुन अनिल खडपेकर यांना परवानगी मंजूर केली. एकदा दिलेली परवानगी ग्रामपंचायतीला रद्द करता येत नाही. अथवा नवीन कागदपत्रांची मागणी करुन त्याचा पुनर्विचारही करता येत नाही. त्यामुळे या विषयात ग्रामपंचायत अंजनवेलची मासिक सभा दि. ३१ मार्च २०१५ ठराव क्र.५ (३) करताना सभेला उपस्थित सरपंच यशवंत बाईत, उपसरपंच नवनाथ धाकटू कुरधुंडकर, सदस्य मनोहर सखाराम पारधी, अख्तर अली यासुद्दीन खतीब, करुणा विनायक कुंभार, उर्वशी उदय धामणस्कर, अब्दुल अजीज हुसेनमियाँ काझी, सुजाता सुभाष गुळेकर, राजेश रमेश धामणस्कर, रंजना रवींद्र सैतवडेकर, संजय गुळेकर, आत्माराम मोरे, यशवंत सैतवडेकर, चंद्रकांत मोरे, लक्ष्मण गुळेकर यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९चा मुंबई अधिनियम क्र.३) चे कलम ३९ (१) नुसार कारवाई करून सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात यावे, असे वाटते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती मयुरेश कचरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
चर्चेचा विषय
नुकतीच अंजनवेल ग्रामपंचायत निवडणूक होऊन भाजप-सेना युतीची सत्ता आली. याआधीचे सरपंच यशवंत बाईत, आत्माराम मोरे यांचा यामध्ये समावेश आहे. एप्रिलमध्ये पहिला कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्यानंतर नव्याने सरपंच निवड होईल, अशावेळी हा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे गेल्याने विषय चर्चेचा होणार आहे.