गुहागर नगरपंचायतीची मालमत्ता मोजणी सुरु
By Admin | Updated: January 7, 2015 23:59 IST2015-01-07T22:14:40+5:302015-01-07T23:59:49+5:30
गुहागर बाजारपेठेमध्ये होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय बनला आहे.

गुहागर नगरपंचायतीची मालमत्ता मोजणी सुरु
गुहागर : येथील नगरपंचायतीची सद्यस्थितीतील मालमत्ता स्पष्ट होऊन करआकारणी व नियमित कामकाज पद्धती स्पष्ट व्हाव्यात, यासाठी पुणे येथील एका कंपनीद्वारे मालमत्ता मोजणीचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
या शुभारंभानंतर कंपनीचे कर्मचारी व नगरसेवकांची विशेष बैठक घेऊन मालमत्ता मोजणीच्या कामासंदर्भात माहिती घेण्यात आली. मोजणीसाठी प्रथम नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी घेतले जाणार आहे. मोजणीमध्ये घरांसह मोकळी जागा, नद्या, नाले आदी सर्व भागांना नंबर दिले जाणार आहेत. या मोजणीसाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी जाणार असून, मोजणीनंतर जागेच्या मुल्यानुसार वेगवेगळे मूल्य स्पष्ट करणारे झोन करण्यात येणार आहेत.
मोजणीमध्ये आताच्या स्थितीतील सर्व मालमत्तेच्या नंबरप्रमाणे फोटोद्वारे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. मोजणीनंतर संबंधिताना नगरपंचायतीतर्फेे नोटीस दिली जाणार असून, यासंबंधी ग्रामस्थांच्या हरकतीही मागवल्या जाणार आहेत. नव्या सीआरझेड कायद्यानुसार गुहागर नगरपंचायतीला सीआरझेड कायदा-२ लागू शकतो. याबाबत चर्चा झाली. नगरपंचायतीचा विकास आराखडा तया करण्यासंदर्भात भास्कर जाधव यांनी सूचना केल्या.
सध्या असलेल्या मच्छी मार्केट शेजारी ८८ लाख ५० हजार निधीतून अद्ययावत मच्छी मार्केट बांधण्यासाठी जागा अपुरी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने तळे बुजवून मच्छी मार्केटसाठी जागा मोकळी केली जाईल, असे सांगितले. वन विभागाकडे असलेल्या गुहागर समुद्र किनारी सुरुबनातील नऊ दुकानदारांची दुकाने पक्की झाली आहेत. दुकान भाडेतत्त्वावर बांधण्यासंदर्भात वनपाल कीर यांना सूचना दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे, उपनगराध्यक्ष स्नेहा वरंडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पद्माकर साटेकर, दीपक कनगुटकर, नरेश पवार, प्रवीण रहाटे, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुहागर बाजारपेठेमध्ये होणारी वाहतूक कोंडी चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन व्याडेश्वर मंदिराशेजारील खोक्यांची बांधकामे तोडून टाका, अशी स्पष्ट सूचना भास्कर जाधव यांनी केली, तर कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, असे नवनिर्वाचित मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले.