काजूच्या टरफलापासून तेल निर्मितीला प्रोत्साहन
By Admin | Updated: March 23, 2015 00:35 IST2015-03-22T23:14:22+5:302015-03-23T00:35:04+5:30
काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे.

काजूच्या टरफलापासून तेल निर्मितीला प्रोत्साहन
एजाज पटेल-फुणगूस--काजूच्या टरफलापासून निघणारे तेल हे वाळवीप्रतिबंधक आहे. या तेलाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तरीही काजूच्या टरफलापासून तेल बनविणारी कारखानदारी कोकणात नाही, ही खंत आहे. काजू प्रक्रिया उद्योग हा केवळ हंगामात चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे उद्योजकांना वर्षभर गुंतून न राहता केवळ चार महिने व्यवसाय करणे शक्य आहे. काजू प्रक्रिया उद्योगामुळे किमान १० ते १५ जणांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. यासाठी कोकणात सुशिक्षित बेकारांनी पुढे येण्याची गरज आहे. सध्या कोकणात काजूबिया तयार झाल्या असून, या बियांच्या खरेदीसाठी परप्रांतीय लोक वाडीवस्तीवर आईस्क्रिम तसेच टोस्ट - बटर घेऊन फिरु लागल्याचे चित्र दिसत आहे.अल्प मोबदल्यात परप्रांतीय लोक टनवारी काजूबी गोळा करतात आणि त्यातून लाखो रुपयांची माया गोळा करतात. कोकणातील काजूबियांचा व्यवसाय परप्रांतीयांच्या हातात असल्याचा आरोप केला जात आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी काजूची लागवड करायची, बिया धरल्यानंतर त्याची राखण करायची आणि प्रत्यक्षात फायदा मात्र परप्रांतीयांनी उठवायचा, असा प्रकार सध्या सुरु आहे. याला पायबंद घातला जावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. परप्रांतीय लोक कोकणात भंगार गोळा करण्याच्या उद्देशाने आले आणि येथे आल्यानंतर चोरीचे भंगार गोळा करण्यापासून काजूबीपर्यंत सर्व व्यवसायावर आपली मक्तेदारी गाजवू लागले आहेत. कोकणातील आंबा, फणस, सागवान आणि जंगली वृक्ष खरेदी करण्याचा सपाटा या परप्रांतीयांनी लावला आहे. अल्पावधीतच कोकणचे रुपांतर बिहार, उत्तरप्रदेशमध्ये करण्याचा त्यांचा विचार असल्याचे पाहायला मिळेल.