मद्यविक्रीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:37+5:302021-09-12T04:36:37+5:30

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात जिल्ह्यात ३ दिवस मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी १० ...

Prohibition of sale of alcohol | मद्यविक्रीला बंदी

मद्यविक्रीला बंदी

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात जिल्ह्यात ३ दिवस मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी १० सप्टेंबर, १४ सप्टेंबर व १९ सप्टेंबर या ३ दिवशी जिल्ह्यातील देशी-विदेशी मद्य व माडी विक्री विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणी आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

सदस्य नोंदणी सुरू गुहागर : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सदस्य नोंदणी अभियान १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार असून सर्व ग्राहकांनी सदस्य व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत केंद्रीय सदस्या तथा कोकण प्रांत सहसंघटक नेहा जोशी यांनी केले आहे. ग्राहकांनी १०० रुपये सदस्यता शुल्क ऑनलाईन भरून सदस्य व्हावे.

महावितरण सज्ज

रत्नागिरी : गणेशोत्सव काळात रत्नागिरी जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश मुख्य अभियंता विजय भाटकर यांनी दिले आहे. जिल्ह्यातील गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांनी रोषणाई करताना योग्य ती दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अर्ज स्थानिक शाखा कार्यालयाकडे सादर करावेत.

अधिकाऱ्यांचा सत्कार

खेड : खेड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शाळांतील ४ शिक्षकांना विस्तार अधिकारपदी बढती मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांनी सन्मान केला.

साहित्य वाटप

खेड : मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेतर्फे तालुक्यातील देवाचा डोंगर येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मनसेचे राज्य सरचिटणीस व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते हे साहित्य विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

अध्यक्ष निवड

खेड : खवटी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विशाल दळवी यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील दांडगा अनुभव लक्षात घेत त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

खड्ड्यांमध्ये वाढ

आरवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येताना चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित डांबराने भरून महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बांधकाम विभाग व ठेकेदाराकडून या सूचनांना केराची टोपली दाखवल्याचे म्हटले जात आहे.

खड्ड्यांमध्ये साम्राज्य

जाकादेवी : निवळी-जयगड मार्गावरील खंडाळा तिठा आजूबाजूच्या २० ते २५ गावांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे येथून सतत वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र या रस्त्यावर सध्या असंख्य खड्डे पडल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत वाटद गावचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे, माजी प्राचार्य शत्रुघ्न लंबे आणि भाजीविक्रेते येलये यांनी मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम केले. परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Prohibition of sale of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.