शासनाविरोधात निषेध मोर्चा

By Admin | Updated: November 9, 2015 23:31 IST2015-11-09T21:13:10+5:302015-11-09T23:31:14+5:30

गुहागर नगरपंचायत : अन्य अतिक्रमणांवरही कारवाईचे आश्वासन

Prohibition Morcha Against Government | शासनाविरोधात निषेध मोर्चा

शासनाविरोधात निषेध मोर्चा

गुहागर : गुहागरमधील वरचापाट मोहल्ला येथील मदरशावर नगरपंचायतीने कारवाई केल्यानंतर आज येथील मुस्लीम बांधवांनी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढत नगरपंचायत कार्यालयासमोर तब्बल तीन तास ठिय्या मांडला व सरकार विरोधात घोषणाबाजी केली. नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या अन्य अतिक्रमणांवर पुढच्या २४ दिवसात कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
गुहागर शहरातील मुस्लीम मोहल्ल्यातील मदरसा तालीम - उल- कुर्रान ही जमातुल मुस्लिमीन, गुहागर या संस्थेची इमारत आहे. सात-बारावरील जागा आणि चालू असलेले बांधकाम यात तफावत असल्याची तक्रार माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी १३ जून २०१३ रोजी विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्याकडे केली होती. त्यानुसार ५ नोव्हेंबरला मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी प्रांताधिकारी रवींद्र हजार,े उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे व विशेष पोलीस बंदोबस्तामध्ये या मदरशा इमारतीचा मागील वाढीव भाग तोडला होता. अशा प्रकारची कारवाई गुहागर शहरात पहिल्यांदाच झाली.
जशी या मदरशावर कारवाई झाली, अशी अतिक्रमण असणाऱ्या अन्य बांधकामांवर कारवाई व्हावी असे निवेदन आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक, गुहागर यांना देण्यात आले.
नगरपंचायतीवर मोर्चा काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व काळी फित लाऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी नगरपंचायतीच्या जनरल सभेमध्ये ठराव घेऊनही अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु, ज्या ठिकाणी धार्मिक शिक्षणाचे पवित्र कार्य केले जात आहे. त्या इमारतीला बळाचा वापर करुन नुकसान पोहोचवण्यासाठी दाखवलेली तत्परता केवळ अल्पसंख्यांक समाजाप्रती असलेली द्वेषभावना आहे, असा आमचा समज झाला असून, नगरपंचायतीने अन्य अतिक्रमण असलेल्या बांधकामांवर कारवाई करुन आमचा समज खोटा ठरवावा.
सकाळी ११ वाजल्यापासून नगरपंचायतीसमोर घोषणाबाजी सुरु करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी इतर अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी जमातुल मुस्लिमीन संस्थेचे अध्यक्ष खलील माहीमकर, शब्बीर माहीमकर, गुलाम सय्यद, मदीना बालाभाई, नदीम सय्यद, मुबीरा माहीमकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)


दीपक कनगुटकर : पाठीशी असल्याचा दावा
या मदरशाबाबत ६ नोव्हेंबरला न्यायालयात तारीख होती. ५ नोव्हेंबरलाच घाईने ही कारवाई करताना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण पाडण्याचा तीन महिन्यांपूर्वी ठराव असूनही कारवाई झाली नाही. मात्र, येथील मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असते याचा राजकीय आकस मनात ठेवून ही कारवाई झाली आहे. आम्ही खंबीरपणे या मुस्लीम बांधवांच्या पाठीशी आहोत, असे नगरसेवक दीपक कनगुटकर यांनी सांगितले.

बांधकामे तोडा
नगरपंचायतीने केलेली कारवाई ठराविक समाजाविरूद्ध केलेली नाही, हे सिद्ध करण्यासाठी अन्य अनधिकृत बांधकामेही तोडा, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Prohibition Morcha Against Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.