‘इंडियन आॅक्झलेट’चे उत्पादन बंद

By Admin | Updated: July 8, 2016 00:55 IST2016-07-08T00:44:25+5:302016-07-08T00:55:14+5:30

लोटे येथील कंपनी : वायू गळतीमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

Production of Indian Acetate is off | ‘इंडियन आॅक्झलेट’चे उत्पादन बंद

‘इंडियन आॅक्झलेट’चे उत्पादन बंद

आवाशी : वायूप्रदूषण झालेल्या इंडियन आॅक्झलेट लि. या लोटे-परशुराम (खेड) औद्योगिक वसाहतीतील कंपनीचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. बुधवारी रात्री आठ वाजता वायू गळती झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आणि लगेचच उत्पादन बंद करण्यात आले आहे.
लोटे औद्योगिक परिसरात गेल्या महिन्याभरापासून जलप्रदूषणाचा मुद्दा जोरदार चर्चेत आला आहे. एका बाजूला ही चर्चा सुरू असतानाच बुधवारी रात्री आठ वाजता येथील इंडियन आॅक्झलेट या कंपनीतून मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे वायू बाहेर परिसरात पसरल्याने एकच घबराट उडाली. परिसरातील आवाशी, गुणदे, लोटे, पिरलोटे, घाणेखुंट, असाणी येथील ग्रामस्थांनी यावेळी कंपनीला भेट दिली. या वायूमुळे डोळ्यांची जळजळ, श्वास गुदमरणे, घशाला खवखव होणे, असा त्रास जाणवू लागला. मात्र, ग्रामस्थ कंपनीवर जाताच काही अवधीत तो कंपनीने आटोक्यात आणला.
ग्रामस्थ कंपनीकडे जात असल्याची माहिती लोटे पोलिसांना मिळाली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्यांनी तत्काळ कंपनीत भेट दिली व पुढील अनर्थ टळला. लागलीच त्याची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी मोरे व सुरक्षा विभागाचे पाटील आपल्या सहकाऱ्यांसमवेत हजर झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानुसार मोरे यांनी त्यांचे कोल्हापूर येथील वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी शिवांगे यांना भ्रमणध्वनीवरून अहवाल दिला. कंपनीचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याचे आदेश शिवांगे यांनी कंपनीला दिले. त्यानुसार बुधवारी रात्रीपासून कंपनीचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. मात्र, यापासून कोणालाही काहीही इजा झाली नसल्याचे समजते.
यादव यांच्याकडे अधिक विचारणा केली असता कंपनीमध्ये अंदाजे शंभर कामगार काम करीत असून, येथे आॅक्झॅलिक अ‍ॅसिडचे उत्पादन घेतले जाते. बाहेर निघालेल्या नायट्रोजन आॅक्साईड अ‍ॅसिडपासून कोणताही त्रास होत नसून, तो लाफिंग गॅस आहे. या कंपनीत तयार होणारा आॅक्झॅलिक अ‍ॅसिड फार्मासिटिकल व टेक्सटाईल कंपन्यांच्या उत्पादनात वापरले जाते. (वार्ताहर)


कोणालाही इजा नाही; ब्लोअर चोंदल्याने घटना
घटनेची माहिती मिळताच मी सहकाऱ्यांसह कंपनीत रात्री गेलो. पाहणी केल्यानंतर याची माहिती कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी शिवांगे यांना दिली. कंपनीत ज्या रिअ‍ॅक्टरचा ब्लोअर चोंदला होता. त्यामुळे हा अपघात घडला. त्याची पूर्णत: दुरुस्ती व तो अद्ययावत करून आमची व सुरक्षा विभागाची पाहणी होईपर्यंत उत्पादन बंद करण्याचे आदेश बुधवारी रात्रीच कंपनीला देण्यात आले आहेत.
- एस. बी. मोरे, प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी, चिपळूण


कंपनीतील रिअ‍ॅक्टरच्या कॉलम आॅक्सिरेशनरमध्ये एअर लॉकिंग झाल्याने त्यातून नायट्रोजन आॅक्साईड अ‍ॅसिड हा पिवळ्या रंगाचा वायू बाहेर पसरला. वातावरण दमट असल्याने तो खाली राहिला. मात्र, हे आम्ही पंधरा मिनिटांत आटोक्यात आणले. यापासून कोणालाही काहीही इजा झाली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशान्वये रात्रीपासून उत्पादन पूर्णत: बंद आहे.
- एम. डी. यादव, प्लँट इनचार्ज, इंडियन आॅक्सलेट लि., लोटे.



कायदा व सुव्यवस्था राखणे व कोणताही अनर्थ घडू नये म्हणून आम्ही तत्काळ कंपनीत गेलो. कुणालाही काहीही इजा झाली नसून, सर्व सुव्यवस्थित आहे.
- भूषण सावंत, हेड कॉन्स्टेबल, लोटे पोलिस दूरक्षेत्र

Web Title: Production of Indian Acetate is off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.