गडनदी धरणग्रस्तांच्या समस्या अद्याप प्रलंबितच

By Admin | Updated: March 5, 2016 00:01 IST2016-03-04T22:40:00+5:302016-03-05T00:01:42+5:30

संगमेश्वर तालुका : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

The problems of the congested damages are still pending | गडनदी धरणग्रस्तांच्या समस्या अद्याप प्रलंबितच

गडनदी धरणग्रस्तांच्या समस्या अद्याप प्रलंबितच

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही प्रलंबित राहिल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तसेच विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व धरणग्रस्तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गडनदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच आहेत. या समस्यांवर तोडगाच काढण्यात आलेला नाही. असे असताना गडनदी प्रकल्पग्रस्तांनी आजपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा दिला. अखेरीस प्रशासनाला जाग येऊ लाली आहे. धरणग्रस्तांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनाचे पदाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत खेरशेत, नांदगाव, शिर्केवाडी, घाडगेवाडी या चार शासकीय तर येडगेवाडी व गायकरवाडी या दोन बाधित गावठाणांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येडगेवाडी रस्ता अडवणूक प्रकरणी विकासाच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
पुनर्वसन गावठाणातील अपूर्ण असलेली कामे पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दि. १९ डिसेंबर रोजी गडनदी पुनर्वसन गावठाणामधील अपूर्ण कामासंदर्भात दौरा केला होता. या दौऱ्यात अपूर्ण असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर कामांची अंदाजपत्रके तयार करुन ती सादर करावीत, अशा सूचना पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध विकासकामांची ११ कोटी ९७ लाख रुपयांची अंदाजपत्रके तयार केली. ही अंदाजपत्रके जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सादर करण्यात आली.
पुनर्वसन गावठाणांमध्ये प्रलंबित असलेल्या विकासकामांच्या यादीत गटारे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, नळपाणी योजना दुरुस्ती तसेच कुचांबे ते येडगेवाडी या मार्गाचे डांबरीकरण, आदी कामांचा समावेश आहे. तसेच खेरशेत पुनर्वसन गावठाणातील पाण्याची विहीर साफ करणे व ट्रान्सफार्मर ते स्मशानभूमी रस्ता खडीकरणासह आठ दिवसात तयार करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाला या बैठकीत देण्यात आल्या आहेत. शासकीय गावठाणातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे सातबारे तातडीने कोरे करावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुचांबे ते येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. यावेळी बैठकीला दिलीप सावंत, दिलीप गायकवाड, अरुण कदम, संतोष गायकवाड, तसेच सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

सवाल : आम्ही आमच्या जमिनी का द्यायच्या?
प्रलंंबित विकासकामांबाबत प्रकल्पग्रस्तांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, त्याला मूर्त स्वरूप आले नाही. अजून काही ठिकाणी प्राथमिक सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. मग आम्ही कोणत्याही विकासकामांसाठी जमिनी का द्यायच्या? असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.


प्रकल्पग्रस्त नाराज
गडनदी धरणाचे काम एकीकडे पूर्णत्वास जात असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मात्र तशाच आहेत. ‘आधी धरण मग पुनर्वसन’ असे धोरण ठरवणाऱ्या शासनानेच आपले धोरण पायदळी तुडवल्याने प्रकल्पग्रस्त नाराजी व्यक्त करत आहेत.

Web Title: The problems of the congested damages are still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.