खासगी कार्यालयधारक मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:46+5:302021-08-21T04:36:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : महापुरात अनेक खासगी कार्यालयांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, हे नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकारी ...

खासगी कार्यालयधारक मदतीपासून वंचित
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुरात अनेक खासगी कार्यालयांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, हे नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळे ठेवण्यात आलेले आहेत. परिणामी हे व्यावसायिक मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी कार्यालयधारकांनाही शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी खेर्डी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण शहर, खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, कालुस्ते, मजरीकाशी, मिरजोळी आदी भागात महापुराचे पाणी शिरले होते. या पुरात घरांचे, दुकानांचेही अतोनात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक खासगी कार्यालयेही महापुरात बाधित झाली आहेत. या खासगी कार्यालयांमध्ये बांधकाम व्यावसायिक, चार्टर्ड अकाउंटंट, विमा आदींसह विविध सेवा देणाऱ्या कार्यालयांचा समावेश आहे. त्या कार्यालयांचा पंचनामा झाला असला तरी हे पंचनामे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेगळे ठेवण्यात आले आहेत, असे दिशा दाभाेळकर यांनी म्हटले आहे.
या खासगी कार्यालयात मोठ्या प्रमाणात असलेली यंत्रसामग्री, फर्निचर, संगणक आदींसह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित असलेल्या कार्यालयधारकांना व्यवसायाप्रमाणे मदत मिळण्याची आवश्यकता आहे. नुकसानीचे पंचनामे वेगळे ठेवण्यात आल्याने बाधित असलेले खासगी कार्यालयधारक मदतीपासून वंचित राहण्याचा धोका आहे, असेही जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर यांनी म्हटले आहे.