देवरुख : देवरुख-संगमेश्वर मार्गावरील लोवले येथे खासगी आराम बस पलटी झाली. हा अपघात आज, बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास झाला. यात तिघे जण जखमी झाले. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत.याबाबत माहिती अशी की, शिवसाई ही खासगी बस (एमएच-०८-ई-९३७०) विरारहून भांबेडच्या दिशेने येत होती. यामध्ये सुमारे २० प्रवासी बसले होते. संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे ही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात चालक, क्लीनर व एक प्रवासी महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी देवरूख येथील राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांना पाचारण केले होते. कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ राजू वाकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.
संगमेश्वरातील लोवले येथे खासगी आराम बस झाली पलटी, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 12:12 IST