पर्यटनातील रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य द्या
By Admin | Updated: October 27, 2015 00:17 IST2015-10-26T23:19:43+5:302015-10-27T00:17:18+5:30
रवींद्र वायकर : चिपळूण शहर परिसर विकासकामांची आढावा बैठक

पर्यटनातील रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य द्या
चिपळूण : नगर परिषदेला पर्यटन विकास योजनेंतर्गत विविध कामांसाठी २ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, केवळ १ कोटी १७ लाखांचीच कामे झाली. रखडलेली उर्वरित कामे जलदगतीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कामे ही चांगल्या पद्धतीनेच झाली पाहिजेत. निधी येऊनही कामे मुदतीत का पूर्ण झाली नाहीत, असा सवाल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी येथे केला.१२ व्या वित्त आयोगांतर्गत चिपळूण शहर परिसर व क्षेत्र परशुरामच्या विकास कामांची आढावा बैठक नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष कबीर काद्री, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तहसीलदार वृषाली पाटील, उपजिल्हाप्रमुख विश्वास सुर्वे आदींसह नगरसेवक व विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्रालयामध्ये प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील योजनांच्या कामाबाबत आपण बैठका घेत आहोत. नगर परिषदेला पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेला निधी मुदतीत खर्च होणे अपेक्षीत होते. निधी प्राप्त झाल्यानंतर तो नियोजीत वेळी खर्ची पडलाच पाहिजे. तो का खर्च झाला नाही अथवा कोठे विकासकामे अडली आहेत याचा उहापोह होणे गरजेचे असल्यानेच ही बैठक घेण्यात आली असल्याचे पालकमंत्री वायकर यांनी स्पष्ट केले.इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर व्ह्यू पॉर्इंटचे काम का पूर्ण झाले नाही, असा सवाल वायकर यांनी केला. आर्कि टेक्ट भास्कर जाधव यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ते काम रखडल्याचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी स्पष्ट केले. रामतिर्थ तलावाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच विरेश्वर तलाव सुशोभिकरणाचे कामही पूर्णत्वाकडे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर पेव्हींग ब्लॉक व काँक्रिटीकरणाचे काम करण्यात जर अडचणी येत होत्या तर ते काम का हाती घेण्यात आले अशीही विचारणा वायकर यांनी केली. येथे सुशोभिकरणाचे कामही होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. गोवळकोट जेटीचे काम पूर्ण झाले असेल तर आठवडाभरात त्याचे उद्घाटन करुन घ्या. निधी असून ही कामे रखडतात, हे योग्य नाही. विकास योजनेत झालेली कामे निकृृ ष्ट दर्जाची होऊन चालणार नाही. निधी खर्च होत नसेल तर आणखी निधी देण्याची सध्या तरी गरज नाही. नारायण तलावाच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी २ लाखांचा निधी मंजूर असून, त्याचा प्रस्ताव त्वरित तयार करावा. शहर परिसरात वेगळे काही घडले नाही तर पर्यटक जाणार कुठे? व्हिजन समोर ठेवूनच कामे सुचवणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास पर्यटन पुस्तकाचे वाचन करा, असा सल्ला वायकर यांनी दिला. (वार्ताहर)
मटण - मच्छी मार्के ट, भाजी मंडई, क्रीडा संकुल आदी कामे मार्गी लागलीच पाहिजेत. चिपळूण शहरातील गटारे, दिवाबत्ती, रस्त्यांची लांबी, रुंदी यांचा मास्टर प्लॅन तयार करायला हवा. कोयनेचे जे पाणी शहरासाठी वापरले जात आहे ते पाणी चांगलं नाही. यासाठी जलशुद्धीकरणासारखा पकल्प हवा. शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीयुक्त सुलभ शौचालय होणेही गरजेचे असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.
परशुराम क्षेत्र येथेही होणाऱ्या कामांचा आढावा वायकर यांनी यावेळी घेतला. परिसरातील ७ पैकी ३ कामे पूर्ण झाल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.