हर्चे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:34+5:302021-09-13T04:29:34+5:30
लांजा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत खानवली गणातील ...

हर्चे येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
लांजा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत खानवली गणातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव लांजा तालुक्यातील हर्चे येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
लांजा तालुक्यामध्ये एनएमएमएस गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी पंचायत समिती खानवली गणातील आहेत. याची जाणीव ठेवून लांजा पंचायत समितीचे माजी सभापती व खानवली गणाचे विद्यमान सदस्य संजय नवाथे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात पुढाकार घेतला. विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशस्तीपत्र आणि भेट म्हणून पुस्तक देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाचे संस्थाध्यक्ष वि. ल. तथा बबन मयेकर, शिवसेनेचे लांजा तालुकाध्यक्ष संदीप दळवी, पूनस बीटचे विस्तार अधिकारी विजयकुमार बंडगर, भडे सरपंच सुधीर तेंडुलकर, हर्चे हायस्कूलचे प्राचार्य जयसिंग पाटील, माजी प्राचार्य विलास पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही. पी. पाटील, सापूचेतळे हायस्कूल व आदर्श शाळा भडे क्रमांक १चे शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण २८ विद्यार्थी, तीन शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक तसेच जिल्हा परिषद, रत्नागिरीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ पटकावणारे खानवली क्रमांक ३ चे पदवीधर शिक्षक सुनील भोसले यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उदय पाटील यांनी केले.