राष्ट्रवादी कॉँग्रेस बदलणार प्रदेशाध्यक्ष !
By Admin | Updated: June 18, 2014 00:55 IST2014-06-18T00:54:29+5:302014-06-18T00:55:00+5:30
भास्कर जाधव यांच्या जागी नवा चेहरा शक्य

राष्ट्रवादी कॉँग्रेस बदलणार प्रदेशाध्यक्ष !
मुंबई : विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जातील, असे संकेत आहेत. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या जागी गृहमंत्री आर. आर. पाटील, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आणले जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार गेले महिनाभर मुंबईत तळ ठोकून आहेत. या काळात ते किमान सात ते आठ हजार पक्ष कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना व्यक्तिश: भेटले. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेतल्या. प्रदेशाध्यक्षपदी प्रभावी वक्तृत्व असलेल्या नेत्याची निवड करावी, जेणेकरून प्रचारामध्ये भाजप-शिवसेनेला जशाच तसे उत्तर देता येईल, असे मत पवार यांच्यासमोर अनेकांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर, अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते.
वर्षभरापूर्वी जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी, तर जितेंद्र आव्हाड यांची कार्याध्यक्षपद नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीच्या घड्याळाला दोन नवे काटे लावूनही लोकसभा निवडणुकीत काही फायदा झाला नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून जाधव यांची कामगिरी निष्प्रभ ठरली. त्यामुळे त्यांच्या जागी अनुभवी नेत्याची निवड केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)