खेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST2021-05-07T04:33:50+5:302021-05-07T04:33:50+5:30
खेड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. खेड शहर, भरणे, ...

खेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
खेड : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. खेड शहर, भरणे, भडगाव, खोंडे, वेरळ, भोस्ते परिसरात सायंकाळी ६ वाजता पावसाची रिमझिम सुरू झाली. मात्र पंधरा मिनिटातच अवकाळी पावसाने जोर पकडला. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा यासह अचानक सुरू झालेल्या पावसाने तुरळक प्रमाणात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली.
तालुक्यातील बीजघर, खोपा, आंबवली, तळे या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भागात पाच वाजण्याच्या सुमारास आभाळ अंधारून येत विजांच्या गडगडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. मे महिना सुरू असल्याने ग्रामीण भागात शेतीची व मान्सून पूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तालुक्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आल्या. अवकाळी पावसाचा खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांना अवकाळी पावसाने अधिक संकटात ढकलले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी गत आठवड्यापासून सकाळच्या सत्रात आंबा विक्रीला येत आहेत.
................................
khed-photo66
खेड शहरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली.