चिपळूण : शहराची भौगोलिक स्थिती तसेच पुरानंतर उद्भवलेली नैसर्गिक परिस्थिती या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी लवकरच महापूर परिषद होणार आहे. यानिमित्ताने भविष्यातील प्रतिबंधक उपाययोजना व पूर येऊ नये, यासाठी शासकीय पातळीवर काय तातडीचे प्रकल्प करावेत, यासंदर्भातील विस्तृत चर्चा केली जाणार आहे.
चिपळुणातील हेल्पिंग हॅण्डसच्यावतीने या परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. याविषयी सतीश कदम यांनी सांगितले की, या परिषदेत विशेष निमंत्रित तसेच तज्ज्ञांची, अभ्यासकांची, लोकप्रतिनिधी, नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. यास्तव नागरिकांमधून ज्या लोकांचा या विषयावर अभ्यास आहे, त्यांनी आपली मते मांडण्यासाठी निमंत्रित केले जणार आहे. महापूर आल्यानंतर चिपळूण शहर व परिसरातील भौगोलिक परिसराचा कोणी अभ्यास वा सर्वेक्षण केले असेल, तर ही माहिती परिषदेच्या निमित्ताने मांडली जाणार आहे.
महापुरानंतर शहर व परिसराचे भौगोलिक सर्वेक्षण व अभ्यास, भूस्खलन तसेच मोठ्या प्रमाणावर डोंगरातील वाहून आलेली माती, प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड व त्यामुळे मातीचा बदललेला स्तर, शहरातून वाहणारी शिवनदी तसेच शहरानजीकच्या वाशिष्ठी नदीतील गाळ, महापुरानंतर चिपळूण शहराचे नियोजन कसे असावे, यासंदर्भात केलेले सर्वेक्षण, भविष्यात महापूर येऊ नये, यासाठी करावयाच्या तातडीच्या उपाययोजना यासंदर्भातला अभ्यास आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने कोणाकडे माहिती उपलब्ध असेल, तर संपर्क साधावा, असे आवाहन सतीश कदम, प्रा. जी. बी. राजे, प्रा. संजय गवाळे, दीपक शिंदे, निसार शेख यांनी केले आहे. याला मिळणारा प्रतिसाद, त्याबाबत मिळणारी माहिती लक्षात घेऊन परिषदेची तारीख निश्चित केली जाणार आहे.