गणेशोत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ठेवावा -विजय भटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:29+5:302021-09-02T05:06:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या उत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ...

गणेशोत्सव काळात वीज पुरवठा अखंडित ठेवावा -विजय भटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. या उत्सव काळात वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याची सूचना मुख्य अभियंता विजय भटकर यांनी केली.
कोकण परिमंडळ मुख्य अभियंता पदाचा कार्यभार विजय भटकर यांनी अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्याकडून स्वीकारला. देवेंद्र सायनेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन भटकर यांचे स्वागत केले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक वैभव थोरात, औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले उपस्थित होते.
मुख्य अभियंता विजय भटकर यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वीज अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधून मार्गदर्शन केले. वादळ, महापूर तसेच कोरोना काळात कोकणातील वीज कामगारांनी अविरत परिश्रम करून नैसर्गिक आपत्तीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र सायनेकर यांनी मुख्य अभियंता पदाचे काम उत्तम प्रकारे पार पाडल्याचे म्हटले आहे.
सद्य:स्थितीत कोकण परिमंडळ अंतर्गत वीज देयक थकबाकी चिंताजनक असल्याचे भटकर यांनी सांगितले. ऐन सणाच्या काळात वीज पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढवू नये यासाठी वीज ग्राहकांनी आपली वीज थकबाकी तातडीने भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता भटकर यांनी केले. काही अधिकारी थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आले असून अशा अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता विजय भटकर यांनी सांगितले.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नियमित मुख्य अभियंतापदी रुजू झालेले विजय भटकर यांनी राज्यातील विविध ठिकाणी वीज क्षेत्रात काम केले असून त्यांच्या अनुभवाचा फायदा कोकण परिमंडळ अंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वीज ग्राहक आणि कामगारांना होईल, असे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी सांगितले.