सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हायला हवा

By Admin | Updated: November 5, 2015 23:58 IST2015-11-05T23:15:46+5:302015-11-05T23:58:52+5:30

मधु चव्हाण : मान खाली जाईल असे एकही काम केलेले नाही

The power should be used for common people | सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हायला हवा

सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हायला हवा

चिपळूण : केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे आपण प्रत्येक कार्यकर्त्याकडे विविध खात्याचे मंत्री असल्याप्रमाणे लोकांचे प्रश्न सोडवायला हवेत, तरच लोक तुमच्याकडे येतील. सत्तेची मधूर फळे, शासनाचे चांगले निर्णय सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवा. मान खाली जाईल, असे काम आपल्या एकाही मंत्र्याने वर्षभरात केलेले नाही, याचा अभिमान बाळगा. हे राज्य टिकवून ठेवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी राहायला हवी, असे आवाहन भाजपचे प्रवक्ते, माजी आमदार मधु चव्हाण यांनी केले.
चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघात आज (गुरुवारी) चिपळूण तालुका भारतीय जनता पक्षातर्फे लोकसंवाद व भाजप सरकारची यशस्वी वर्षपूर्ती साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश प्रवक्ते चव्हाण, माजी आमदार व प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या सरचिटणीस नीलम गोंधळी, प्रभारी तालुकाध्यक्ष रामदास राणे, शहराध्यक्ष वैशाली निमकर, युवाध्यक्ष प्रणय वाडकर उपस्थित होते. शेखर साबळे, निशिकांत भोजने, महेश दीक्षित, संजय घेवडेकर आदींनी त्यांचे स्वागत केले.
प्रभारी अध्यक्ष रामदास राणे यांनी प्रास्ताविक केले. पक्ष प्रवक्ते चव्हाण म्हणाले, पराभवाची जळमटे संपवून आजपासून विजयाची सुरुवात करायची आहे. ज्यांनी निर्लज्जपणे देश लुटला. आयुष्यभर एकाच घरात पाणी भरले. ते आता मोर्चे, आंदोलने करत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी खंबीर उभे राहायला हवे. हा देश आपल्याला उभा करायचा आहे, हे आपले स्वप्न आहे. नद्या जोडप्रकल्पाच्या माध्यमातून गावागावात काम सुरु आहे. छोट्या छोट्या गोष्टी, सरकारचे छोटे छोटे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत. सरकार व जनता यामध्ये कार्यकर्ते उभे राहिले तर सरकार फार काळ टिकते. मारामाऱ्या करुन आपल्याला राजकीय सूड उगवायचा नाही तर आपला पक्ष वाढवून हा सूड घ्यायचा असतो. भविष्यात रेशनवर पाच वस्तुंचा भाव स्थिर ठेवण्याचा आपल्या सरकारचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पराभवाने खचून जायचे नसते. तसे विजयाने आळशी होऊ नका. सतत काम करत राहा. आपली राजकीय ताकद ही सभेतील गर्दीवर अवलंबून नाही तर एक एक माणूस जोडून केलेल्या समाजकार्यावर आहे. मरगळ झटकून आपला नवा - जुना वाद न करता आपण सर्व कार्यकर्ते एक आहोत, अशी भूमिका स्वीकारुन विशाल रुप धारण करा आणि भारतीय जनता पक्षाची फळी मजबूत करा, असे आवाहनही प्रवक्ते चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक विजय चितळे यांनी केले. (प्रतिनिधी)


हा कसला जुना मित्र?
सिंचन घोटाळ्यात दीड ते दोन हजार कोटींचा घोटाळा चिपळूण येथील पाटबंधारे कार्यालयातून झाल्याचा गौप्यस्फोट केला. मित्रपक्ष कोयनेच्या पाण्याबद्दल बोलतात. त्याला काही अर्थ नाही. मात्र, आपण कार्यकर्त्यांनी ठामपणे वस्तुस्थिती जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला हवी. भाजपबरोबर मित्राची अशी भाषा असेल तर जुना मित्र कसला? त्यांना देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा समजते. चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गामुळे विकास होणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: The power should be used for common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.