कोंबडी वाटप गाजवले
By Admin | Updated: April 28, 2015 23:44 IST2015-04-28T22:13:06+5:302015-04-28T23:44:03+5:30
चव्हाण यांची मागणी : चिपळूण पंचायत समिती सभा

कोंबडी वाटप गाजवले
अडरे : चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात सदस्यांना विश्वासात न घेता कोंबड्यांचे परस्पर वाटप केल्याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जीतेंद्र चव्हाण यांनी आज मंगळवारी झालेल्या मासिक सभेत केली.
चिपळूण शहरातील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सकाळी ११.३० वाजता पंचायत समितीची मासिक सभा सभापती समिक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती सुचिता सुवार, गटविकास अधिकारी गणेश पिंपळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले आदींसह सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्य उपस्थित होते.
पंचायत समितीच्या सेस फंडातून २५५ कोंबड्यांचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या रामपूर गणात ४ कोंबड्या व १ कोंबडा अशा एकूण ५ याप्रमाणे परस्पर सदस्यांना विश्वासात न घेता वाटप करण्यात आले. या विषयावरुन सभेत गदारोळ झाला. याप्रकरणी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक सकपाळ यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.
या चौकशी प्रकरणाबाबत ठरावही करण्यात आला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंप कनेक्शन जोडणी गेली २ वर्ष महावितरण कंपनीने दिलेली नाहीत. केवळ टेंडर प्रक्रियाच सुरुच असते. याबाबत अद्यापही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही असा आरोप सदस्य रघुनाथ ठसाळे यांनी केला. चिपळूण पंचायत समितीच्या मााासिक सभेत सदस्यांनी आक्रमक होत विविध प्रश्नांवर उहापोह केला. अवकाळी पाऊस, वीज जोडण्या, पाणी , पशुसंवर्धन विभाग याबाबत गांभिर्याने चर्चा करण्यात आली. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी अज्ञान आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून सर्व्हे करावा आणि योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुरेश खापले यांनी केली. आज झालेल्या सभेत बांधकाम विभाग, एस. टी. महामंडळ, आरोग्य, पाणी पुरवठा, सामाजिक वनीकरण, रस्ते आदी कामांबाबतही चर्चा झाली. चर्चेत सदस्य सहभागी झाले होते. (वार्ताहर)
चौकशीचा ठराव...
चिपळूण तालुका पंचायत समितीची मासिक सभा आज पंचायत समंतिीचे माजी सभापती जीतेंद्र चव्हाण यांनी वादळी चर्चा करून गाजविली. सदस्यांना विश्वासात न घेता कुक्कुट वाटप करण्यात आला. यातील दोषींची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. रामपूर गणात सदस्यांना विश्वासात न घेता कुक्कुट वाटप झाल्याने चव्हाण हे संतप्त झालेव त्यांनी या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला. चौकशी करणारा ठराव करण्यात आला. या ठरावानंतर पंचायत समिती परिसरात खळबळ माजली आहे.