‘सुंदर रत्नागिरी’च्या चित्रांवर पोस्टर्सचे डाग...
By Admin | Updated: May 15, 2015 23:31 IST2015-05-15T23:06:11+5:302015-05-15T23:31:28+5:30
चित्रकलेची ऐशीतैशी : जिकडे-तिकडे पोस्टर्स चिकटवण्याच्या वृत्तीने बिघडवली चित्रे

‘सुंदर रत्नागिरी’च्या चित्रांवर पोस्टर्सचे डाग...
रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन महोत्सवानिमित्त पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर रेखाटलेल्या चित्रांवर पोस्टर्सचे डाग लावण्यास आता खुद्द रत्नागिरीकरच पुढे सरसावले असून, विविध कार्यक्रमांची पोस्टर्स या चित्रांवर लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
रत्नागिरीत २ ते ४ मे या कालावधीत पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पर्यटकांना जिल्ह्याच्या विविध वैशिष्ट्यांची तसेच लोककला, लोकजीवनाची माहिती व्हावी, यासाठी येथील प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या भिंतीवर तब्बल २८ चित्रे रेखाटली होती. जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड-किल्ले, मंदिरे, कोकणातील पारंपरिक लोकसंस्कृती आणि खाद्य संस्कृती, पक्षी, प्राणी, जलचर यांचे जीवन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ३५० फूट लांब आणि ६ उंचीच्या नवीन संरक्षक भिंंतीवर चितारले होते. सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट आणि देवरूख येथील डी-कॅड या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग १३ दिवस अथक प्रयत्न करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्युरल पेंटिंगच्या तंत्राने व आकर्षक चित्रांनी या भिंंती रंगविल्या होत्या.
मात्र, महोत्सव संपताच ही चित्र दुर्लक्षित झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमाचे पोस्टर भिंतीवर येथील एका संस्थेकडूनच लावले गेले होते. मात्र, कदाचित लक्षात आल्यानंतर ते तिथून काढण्यात आले असले तरी ते पोस्टर चिकटवताना तसेच काढताना त्या चित्राचा रंग उडाला आहे. खरेतर प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी या विविध कला जतनाची जबाबदारी येथील विविध कंपन्यांकडे द्यावी, असा मानस व्यक्त केला होता. मात्र, महोत्सव संपून जेमतेम दहा दिवस होतात न होतात तोच त्या चित्रांचे संवर्धनच धोक्यात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
हजारो रूपयांचा खर्च आणि त्यासाठी चित्रकारांनी घेतलेली मेहनत जिल्हा प्रशासन तसेच शहर प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे. महोत्सवाची धामधूम संपते न संपते तोच हेतू साध्य करण्यासाठी चितारलेल्या उत्कृष्ट चित्रांच्या आविष्कारावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टर्सचे डाग पडू लागणे, ही बाब दुर्दैवी असल्याची खंत प्रा. राजेशिर्के यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)