इमारतीची दयनीय अवस्था कायम...
By Admin | Updated: October 14, 2014 23:15 IST2014-10-14T22:00:38+5:302014-10-14T23:15:22+5:30
कडवई आरोग्यकेंद्र : कर्मचाऱ्यांवर मृत्यूघंटा

इमारतीची दयनीय अवस्था कायम...
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी मोडकळीस आलेल्या इमारतीत दवाखाना चालवत आहेत. दोन वर्षांपूर्वी दवाखान्यासाठी नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अर्धवट पडून आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काम पूर्ण नसताना ठेकेदाराला मात्र जवळजवळ पूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे.
कडवई येथील पशुवैद्यकीय दवाखाना हा आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मात्र, सध्या हा दवाखाना अखेरची घटका मोजत असल्याचे पाहायला मिळते. या दवाखान्याची मूळ इमारतही कोसळण्यात आली असून, बाजूच्याच एका इमारतीत दवाखाना थाटण्यात आला आहे. त्याच्याच बाजूला नवीन इमारतीचे काम सुरु आहे. दवाखाना सुरु असणारी इमारत ही अत्यंत धोकादायक बनली आहे. भिंतींना तडे गेले असून, इमारतीचे छप्पर मोडकळीस आले आहे. पावसामध्ये तर इमारतीत तळे तयार होते. अशा परिस्थितीत जनावरांची औषधे, खाद्य ठेवणे गैरसोयीचे झाले आहे. आपण या इमारतीत नाईलाजाने काम करत असून, वादळ पाऊस असताना तर दवाखाना बंद करुन बाहेर थांबावे लागते, असे येथील पशुधन पर्यवेक्षक आर. एस. गाडेकर यांनी सांगितले. याबाबत आपण ग्रामपंचायत आणि पशुधन विकास अधिकारी, देवरुख यांना अनेकवेळा कल्पना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
या दवाखान्यासाठी नवीन इमारत बांधण्याचे काम जानेवारी २०१३ पासून सुरु करण्यात आले. यासाठी मजबूत सुविधांतर्गत ९ लाख १५ हजार ७०० रुपये रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र, ८ लाख १८ हजार ६६७ रुपये रकमेची बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली. मात्र, काम अपूर्णच आहे. उर्वरित रक्कम ही बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. काम अपूर्ण असताना बांधकाम विभागाने पूर्ण रक्कम ठेकेदाराला अदा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीनेही इमारतीचे काम अर्धवट असताना ठेकेदाराची बिले अदा का केली, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
दवाखान्याचे कर्मचारी मृत्यूच्या छायेत नोकरी करत असून, प्रशासन या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. सर्व गोंधळात नागरिकांच्या सोयीसुविधांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
नवीन इमारतीचे काम अपूर्ण
संगमेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कडवई येथे दवाखान्याची इमारत नव्याने बांधण्याचे काम सुरू झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम अपूर्ण स्थितीत आहे. याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.