इंदवटीत पोलिओग्रस्त मुलगी?
By Admin | Updated: August 11, 2015 23:06 IST2015-08-11T23:06:40+5:302015-08-11T23:06:40+5:30
आज विशेष लसीकरण : प्रतीक्षा पुणे प्रयोगशाळेतील अहवालाची

इंदवटीत पोलिओग्रस्त मुलगी?
लांजा : चालताना एका बाजूला तोल जात असलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या इंदवटी येथील १२ वर्षांच्या मुलीला पोलिओ झाला असल्याचा संशय लांजा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तिला प्रथम रत्नागिरी व त्यानंतर मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर खबरदारी म्हणून इसवली गावामध्ये बुधवारी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.तालुक्यातील इंदवटी बौद्धवाडी येथील दीक्षा नामदेव जाधव (१२) ही ५ वी मध्ये शिक्षण घेत आहे. १ आॅगस्ट रोजी दीक्षा हिला शरीराच्या एका बाजूचा हात व पाय हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे तसेच चालताना एका बाजूला तोल गेल्यासारखे वाटल्याने तिने आपल्या घरच्या मंडळींना सांगितले. तत्काळ पालकांनी तिला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. दीक्षाला उठता येत नव्हते. थोडेसे चालल्यानंतर तिचा तोल जातो, ही लक्षणे पोलिओची असल्याचा संशय लांजा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सतीश पाटील यांना आला. त्यांनी तत्काळ दीक्षा हिला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला पालकांना दिला. लांजा ग्रामीण रुग्णालयात या संबंधित कोणतीच सोय नसल्याने तिला रत्नागिरी येथे उपचारासाठी घेऊन जाणे योग्य असल्याने पालकांनी तत्काळ रत्नागिरी येथे हलविले.