माेडकाआगर पुलाच्या राजकारणातून तालुकावासीयांच्या माथी त्रासच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:52+5:302021-06-16T04:41:52+5:30
गुहागर / संकेत गोयथळे : गुहागर तालुका हा राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातही शांत व संयमी तालुका म्हणून ओळखला जातो. मोडकाआगर ...

माेडकाआगर पुलाच्या राजकारणातून तालुकावासीयांच्या माथी त्रासच
गुहागर / संकेत गोयथळे : गुहागर तालुका हा राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातही शांत व संयमी तालुका म्हणून ओळखला जातो. मोडकाआगर पूल व त्यातून घडलेले राजकारण यातून तालुकावासीयांचा संयम पुन्हा एकदा दिसून आला. गेली तीन वर्षे या पुलाच्या राजकारणातून तालुकावासीयांना मोठा त्रास सोसावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. जनता व राजकारणी यामध्ये ‘कौन जीता कौन हारा’ हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.
तालुक्यात १९७२ साली मोडकाआगर पूल बांधण्यात आला. पंधरा वर्षांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून, या पुलाला तब्बल ४८ वर्षे झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी हा पूल धोकादायक असल्याचे समाेर आल्यानंतर प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर वाहनचालकांना तब्बल बारा किलोमीटर अधिकचा प्रवास रानवी - पालपेणेमार्गे शृंगारतळी असा करावा लागला. वाहनचालकांनी यातूनच जवळचे मार्गही शोधले. सुरुवातीच्या काळात बंद केलेल्या पुलाच्या बाजूला भराव करून काही महिने वाहतूक सुरू होती. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर गुहागर - विजापूर महामार्ग अंतर्गत प्रत्यक्ष पुलाचे काम सुरु झाल्यानंतर येथील वाहतूक पुन्हा बंद झाली. अशावेळी पहिल्यांदा धरणाशेजारील भागातून काही महिने रस्ता सुरू होता. याठिकाणी वाहने रुतण्याचे प्रकार वाढल्याने वरवेलीमार्गे जंगल पायवाटेतून रस्ता सुरू झाला. त्या रस्त्याने अनेकांचे अपघात झाल्याने वरवेली ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोठा केला.
तब्बल दोन वर्षानंतर अखेर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर तत्कालिन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वरवेली रस्त्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर माजी आमदार विनय नातू यांनी या पुलाच्या कामासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचे अनेकदा जाहीर केले. त्यातूनच खऱ्या अर्थाने श्रेयवादाच्या लढाईतून राजकारण सुरू झाले. त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी सुरुवातीलाच या पुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत होऊ शकते, इतर पक्षाचे नेते यामध्ये लक्ष घालत आहेत मग मी कशाला लक्ष घालू, असे अनेकवेळा सूचक विधान केले. अनेक महिने वाहनचालकांनी आर्थिक व मानसिक त्रास सहन केल्यानंतर अखेर पुलाच्या बाजूला भराव टाकून रस्ता सुरू झाला. याला भास्कर जाधव समर्थकांनी ‘भास्कर सेतू’ असे नाव देत हे काम फक्त आमदार करू शकतात इतर कोणाला जमणार नाही, असाच इशारा दिला. पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर या पुलाबाबत आपल्याकडे कोणीच व्यथा घेऊन एकदाही आले नाही, अशी कैफियत भास्कर जाधव यांनी अनेकदा मांडली व ही वस्तुस्थिती आहे.
---------------------
धाेकादायक पूल बनला सुरक्षित
तीन वर्षांपूर्वी मोडकाआगर पूल वाहतुकीसाठी बंद केला एवढेच नव्हे तर या पुलावरून चालण्यासही परवानगी नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पुलावरून एवढे मोठे रामायण - महाभारत झाले त्याच पुलावरून नव्या पुलाचे बांधकाम होताना लागणारे रेती, स्टील असे अवजड टनावारी साहित्य तसेच नियमित वाहतूक आजही सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी अचानकपणे धोकादायक झालेला पूल त्यानंतरच्या काळात सुरक्षित कसा झाला, हे न सुटणारे कोडे आहे.