शहराबाहेर मुरणाऱ्या पाण्याने ‘राजकीय थरार’
By Admin | Updated: July 6, 2015 00:25 IST2015-07-05T21:40:29+5:302015-07-06T00:25:36+5:30
रत्नागिरी नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

शहराबाहेर मुरणाऱ्या पाण्याने ‘राजकीय थरार’
रत्नागिरी : शहराबाहेर असलेल्या शिरगाव - तिवंडेवाडीतील ४१० फ्लॅटच्या इमारतींना नळजोडणी देण्यास शिवसेनेसह अन्य सदस्यांनी पालिका सभेत तीव्र विरोध दर्शवल्यानंतर ठराव स्थगित ठेवण्यात आला. मात्र, हा ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याने पालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. हा ठराव ३०८ अन्वये रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या व शहराबाहेर मुरणाऱ्या या पाण्यामुळे आता पालिकेत ‘राजकीय थरार’ निर्माण झाला आहे.
१८ मेच्या पालिका सभेच्या सुरूवातीलाच शिवसेनेतर्फे तिवंडेवाडी येथे नळजोडणी देण्यास विरोध असल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर सभेत हा विषय चर्चेस आल्यानंतरही शिवसेनेसह अन्य नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला होता. आधी शहरातील लोकांना पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. अनेक भागात नागरिकांचे पाण्याचे हाल होते आहेत. पाणी पुरवठा विस्कळीत आहे. जलवाहिन्या खराब झाल्या आहेत. असे असताना शहराबाहेर पाणी देण्यामागील नेमके प्रयोजन काय, असा सवालही करण्यात येत आहे.
प्रत्यक्षात सभेच्या इतिवृत्तात ठराव मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले. तसेच संबंधित ठिकाणी बिल्डरने जलवाहिनीही टाकली हे समजताच शिवसेनेचे नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना हा इतिवृत्तात मंजूर झालेला ठराव रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. त्यावेळी याबाबतची पूर्ण माहिती घेऊन चुकीच्या पध्दतीने ठराव झालेला असल्यास रद्द केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांना भेटलेल्या नगरसेवकांनी सांगितले.
हा ठराव चुकीच्या पध्दतीने मंजूर झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात आणखीही काही नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर तर झाले नाहीत ना, याबाबत शहरवासीयांत आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)
सेना-भाजपातील दरी रुंदावली...
रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे भाजपचे असून, त्यांचा सव्वा वर्षाचा अध्यक्षपदाचा कालावधी येत्या २४ जुलै २०१५ रोजी संपत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या मागणीनुसार सहा महिन्यांसाठी भाजपच्या नगराध्यक्षाला शिवसेनेने मुदतवाढ दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती तुटल्याने केवळ सहा महिन्यांसाठी नगराध्यक्षपद सव्वा वर्षानंतरही सोडण्यास मयेकर यांची तयारी नसल्याने शिवसेना आधीच संतप्त आहे. त्यामुळे भाजपची पालिकेत कोंडी करण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.