अध्यक्षपदासाठी राजकीय मोर्चेबांधणी

By Admin | Updated: December 5, 2015 00:24 IST2015-12-04T22:26:58+5:302015-12-05T00:24:48+5:30

जिल्हा परिषद : दापोली-चिपळूणच्या उमेदवारांमध्ये चुरस

Political Frontage for Presidency | अध्यक्षपदासाठी राजकीय मोर्चेबांधणी

अध्यक्षपदासाठी राजकीय मोर्चेबांधणी

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असून, नवीन अध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता जावकर आणि चिपळूणचे सदस्य बुवा गोलमडे यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सव्वातीन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ घटले आहे. कारण संगमेश्वर तालुक्यातील काँग्रेसचे विलास चाळके आणि मंडणगडच्या राष्ट्रवादीच्या शीतल जाधव यांनी शिवसेनेमध्ये तर, राजापूरचे सुरेश लाड यांनी काँग्रेसला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. शीतल जाधव या समाजकल्याण समितीच्या सभापती पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे संजय कदम हे आमदारपदी निवडून आल्यानंतर भरणे गट आणि राजापूरचे राष्ट्रवादीचे जैतापकर हे अपात्र ठरल्यानंतर झालेल्या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ घटले आहे. सध्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे ३०, भाजपचे ९, राष्ट्रवादीचे १५, काँग्रेसचे १ आणि बविआचे २ सदस्य आहेत. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा असल्याने लाल दिव्याच्या गाडीसाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. राजापकर यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपत आल्याने दापोलीच्या सदस्या जावकर आणि चिपळूणचे गोलमडे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.जावकर या दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती असून, त्यांनी सभापतीपदाच्या कालावधीमध्ये दापोली तालुक्यावर आपले नाव कोरले होते, तर गोलमडे हे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आहेत. जावकर या दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थक म्हणून मानल्या जातात. माजी आमदार दळवी यांच्या शिवसेनेतील राजकीय वजनामुळे दापोली तालुक्याला दोन वेळा अध्यक्षपद लाभले होते. मात्र, दळवी समर्थक रोहिणी दळवी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर संजय कदम यांनी शिवसेनेचा व जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दळवी यांच्यावर कदम यांनी विजय मिळवून ते आमदार झाले. जावकर या माजी आमदार दळवी यांच्या समर्थक असल्याने त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या दावेदार ठरणार, अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर चिपळूण तालुक्याचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांचे गोलमडे यांना कितपत सहकार्य लाभते, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, दोन्ही बाजूनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु असली तरी सव्वा वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी जावकर की, गोलमडे यांच्यापैकी कोण फायदेशीर ठरणार, याचाही विचार सेनेकडून होईल, असे मानले जात आहे. (शहर वार्ताहर)

मागे वळून पाहताना. : युतीचे होते वर्चस्व पण...


तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी शिवसेनेने २५, भाजप ८, राष्ट्रवादी १९, काँग्रेस ३ आणि २ जागांवर बविआने यश मिळवले होते. जिल्हा परिषदेत युतीचे वर्चस्व असताना केवळ महिला अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा जाधव यांच्या पारड्यात पडले होते.

संपणार कार्यकाल
मनीषा जाधव यांच्यानंतर आमदार राजन साळवी यांचे समर्थक जगदीश राजापकर यांच्या रुपाने लांजा तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभले होते. राजापकर यांचा अध्यक्षपदाचा सव्वा वर्षाचा कार्यकाल २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.

Web Title: Political Frontage for Presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.