राजकीय ‘धक धक’
By Admin | Updated: October 20, 2015 23:49 IST2015-10-20T23:05:34+5:302015-10-20T23:49:32+5:30
रत्नागिरी पालिका : चार जागांसाठी पंधरा उमेदवार रिंगणात

राजकीय ‘धक धक’
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या ४ जागांसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत नेमके काय होणार, कोणाचा प्रचार फळाला येणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रचाराचा वेग वाढला असतानाच कोणाकडे किती कार्यकर्ते याचाही हिशेब लावला जात असून, विजयाबाबतचे गणित मांडताना सर्वच पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची धकधक वाढली आहे. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे ते अपात्र झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, या चारही जागा मुळात राष्ट्रवादीच्या असल्याने राष्ट्रवादी पुन्हा या जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सेनेतून परत आलेले उमेश शेट्ये हे राष्ट्रवादीसाठी हुकुमाचे अस्त्र असल्याने या चारही जागा राष्ट्रवादीच जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही वाटतो आहे.
वाट्टेल ते झाले तरी या चारही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडेच आल्या पाहिजे, असे निर्देश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्यामुळे या पोटनिवडणुकीत राज्य पातळीवरूनही लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत यांनीही या पोटनिवडणुकीत किमान २ जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. भाजपच्या प्रचाराचा छुपा वार कोणाला घायाळ करणार, असा प्रश्नही चर्चेत आला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या १९ आॅक्टोबर या शेवटच्या दिवसापर्यंत २४ पैकी ९ अर्ज मागे घेतले गेले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १५ उमेदवार उरले आहेत.
सेना, भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार, मनसे २ व अपक्ष आशिष केळकर मिळून एकूण १५ उमेदवार या निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत. (प्रतिनिधी)
चार जागा : त्यांची बोलती बंद
प्रभाग २मधील २, तर प्रभाग चारमधील २ अशा चार जागांसाठी एकूण दोन्ही प्रभागात जुने जाणते नेते - कार्यकर्ते मतदारांना भेटून त्यांचे मत आपल्या उमेदवाराच्या पारड्यात टाकण्यासाठी मनपरिवर्तन करीत आहेत. मात्र, काही उमेदवारांचे मतदारांना नावही माहिती नसल्याने त्यांनी विकासकाम काय केले, हे विचारणेही आता अवघड झाले आहे.