लोटणकरांना न्याय मिळवून देण्यास पोलीसच असमर्थ

By Admin | Updated: July 2, 2015 22:44 IST2015-07-02T22:44:54+5:302015-07-02T22:44:54+5:30

वाळीत प्रकरण : पूजेचे अधिकार जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार

Police is unable to get justice for the people of Loton | लोटणकरांना न्याय मिळवून देण्यास पोलीसच असमर्थ

लोटणकरांना न्याय मिळवून देण्यास पोलीसच असमर्थ

रत्नागिरी : गावातील मंदिराची व्यवस्था पाहणाऱ्या वृद्ध गावकऱ्याकडून जबरदस्तीने पूजेचे अधिकार काढून घेऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला वाळीत टाकण्याचा प्रकार परटवली गावकरीवाडी (ता. राजापूर) येथे गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. याबाबत या दाम्पत्याने रायपाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलीस या दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यास असमर्थता दर्शवत आहेत.परटवली येथील गंगो देवाच्या मंदिरात देवाला नारळ ठेवणे, प्रसाद लावणे हे काम गावकरवाडी येथील श्रीधर लोटणकर हे अनेक वर्षांपासून पाहात आहेत. ६५ वर्षीय श्रीधर लोटणकर सध्या अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांचा मुलगा संतोष पत्नीसह नोकरीनिमित्त मुंबईला असतो, तर दोन मुली विवाहित आहेत. आजारपणामुळे देवळाचे काम होत नसल्याने २००७ साली गावाने बैठक घेऊन लोटणकर यांना नारळ ठेवून बाजुला होण्यास सांगितले. लोटणकर यांनी देवळाचे काम सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांनी नारळ ठेवून देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे श्रीधर लोटणकर व त्यांची पत्नी शारदा यांच्यावर वाडीने बहिष्कार टाकला आहे. या प्रकारात त्यांचा पुतण्या दीपक लोटणकर हा मुख्य सूत्रधार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दीपक लोटणकर याच्याकडून या वृध्द दाम्पत्याला शिवीगाळ करणे, धमकावणे, अंगावर धावून जाणे असे दडपशाहीचे प्रकार सुरू होते. आपण शिवसेनेचे कार्यकर्ता आहोत. या कुटुंबाशी संबंध ठेवाल तर तुमच्या घरीही धार्मिक कार्य होऊ देणार नाही, अशी धमकी तो गावातल्या लोकांनाही देत असल्याने आता पूर्ण भावकीनेच भीतीने या कुटुंबाला दूर ठेवले आहे. गावातील पाणी योजनेपासून श्रीधर लोटणकर यांच्या कुटुंबियांना दूर ठेवले जात आहे. अशा अनेक गैरसोयींना या कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत लोटणकर यांनी गावच्या तंटामुक्त समितीकडेही आपली कैफियत मांडली. मात्र, हा तुमचा घरगुती मामला आहे, तो तुम्हीच सोडवा, असे सांगण्यात आले. दीपक लोटणकर याच्या धमकीमुळे भयभीत झालेल्या श्रीधर लोटणकर यांच्या पत्नीने ४ जूनला रायपाटण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यावेळी सरपंचांसह इतरांनीही लोटणकर कुटुंबियांना कुठे जायचे ते जा. आमचे कुणी वाकडे करू शकत नाही, असे सांगितले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी ६ जून रोजी श्रीधर लोटणकर यांची पत्नी तसेच वाडीतील इतरांना बोलावून समज दिली. यावेळी पाण्यासाठी बंदी करता येणार नाही, असे सांगून या योजनेच्या पाईपलाईनसाठी जो खर्च असेल तो लोटणकर यांना सांगा, असेही सांगितले. मात्र, त्यानंतर पोलीस पाटील यांनी पाईपलाईन देण्यास वाडीतील लोकांचा विरोध असल्याचे सांगितले. यानंतर १६ रोजी लोटणकर यांच्या पत्नीने ओटवणेकर यांच्या कानावर ही बाब घातली. मात्र, ही तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे करा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता तंटामुक्त समिती, पोलीस यंत्रणा न्याय द्यायला असमर्थ असल्याने याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी श्रीधर लोटणकर यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

श्रीधर लोटणकर आणि त्यांचे कुटुंबीय तसेच परटवली गावकरवाडीतील लोकांना एकत्र बोलावून याबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून, लोटणकर यांना त्रास देणाऱ्या लोकांना समज देण्यात आलेली आहे. लोटणकर यांच्या पाण्याचा प्रश्न आहे. पण त्यांना पाण्यावर बंदी आणलीत तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे. पण लोटणकर म्हणतात तसे या मंडळीवर वाडीचा बहिष्कार वगैरे काहीही नाही.
- एस. एस. ओटवणेकर,
सहायक पोलीस निरीक्षक, रायपाटण

Web Title: Police is unable to get justice for the people of Loton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.