चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यास पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST2021-03-21T04:30:35+5:302021-03-21T04:30:35+5:30
लांजा : सव्वा महिन्यापूर्वी चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लावण्यात लांजा पोलिसांना यश आले असून, कोल्हापूर येथून संशयित आरोपीला सापळा ...

चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यास पोलिसांना यश
लांजा : सव्वा महिन्यापूर्वी चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लावण्यात लांजा पोलिसांना यश आले असून, कोल्हापूर येथून संशयित आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. कोणताही धागादोरा नसताना लांजा पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुक्यातील वाघ्रट बौद्धवाडी येथील मंगेश मधुकर कांबळे (३०) यांची टीव्हीएस दुचाकी (एमएच ०८ ए/ डब्ल्यू ६४६९) १२ फेब्रुवारीला चोरीला गेली होती. घराच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने, त्यांनी आपली दुचाकी नजीकच्या शाळेजवळ उभी केली होती. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता ते कामाला जाण्यासाठी निघाले असता, दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी दिसली नाही. त्यावेळी त्यांना कोल्हापूरला जायचे होते. घरातील कोणी किंवा मित्र दुचाकी घेऊन गेले असतील आणि ते परत आणून ठेवतील, अशा विचाराने ते कोल्हापूरला गेले.
दि.१५ मार्च रोजी ते गावी परत आले. मात्र, दुचाकी कुणीही आणून ठेवलेली नसल्याने, त्यांनी दि.१६ मार्च रोजी लांजा पोलिसांत दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली. दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. त्यात संशयित म्हणून संतोष वसंत माळकर (४०, रायगड) याचे नाव पुढे आले. त्याच्या मोबाइल क्रमांकावरून त्याचा शोध सुरू झाला. संतोष कोल्हापूर येथे राहण्यासाठी गेल्याने त्याच्या शोधासाठी लांजा पोलीस पथक तयार करण्यात आले. यामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, हेडकाॅन्स्टेबल राजेंद्र कांबळे, सुनील पडळकर, महेश जगताप यांचा समावेश होता.
खात्रीलायक खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे पोहोचलेल्या पथकाने सापळा रचला. मात्र, संतोषने दोन दिवस पोलिसांना चकवा दिला. अखेर तिसऱ्या दिवशी संतोष पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
पोलिसांनी संतोषला दुचाकीसह लांजात आणले आहे. सापुचेतळे येथे संतोष रोजंदारीची कामे करत होता. दुचाकी चोरल्यानंतर तो आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूर येथे राहावयास गेला होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. संतोषला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.