चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश

By Admin | Updated: May 23, 2016 00:23 IST2016-05-22T21:16:07+5:302016-05-23T00:23:02+5:30

खेड तालुका : तपास यंत्रणेबाबतच प्रश्नचिन्ह!

Police failure to make a thief | चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश

चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश

खेड : खेडमध्ये एकाच आठवड्यात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. १२ मे रोजी दोघा ठकांनी एका नागरिकाचे लाखभर रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे, तर बसस्थानकात एका महिलेचे सुमारे ५ लाख रुपयांचे दागिने चोरून पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. मात्र, आजतागायत पोलिसांनी याबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही.घरफोड्या आणि चोऱ्यांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. या प्रकरणांचा छडा लागणे पोलिसांना शक्य होत नाही. मुळात पोलीसच दुर्बल होत चालल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यातील अनेक चोऱ्यांचा माग काढण्यात या खात्याला अपयश आले आहे. चोऱ्यांचा छडा लागत नाही की छडा लावण्यात पोलिसांनाच रस नाही, पोलिसांच्या भूमिकेचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.दागिने घेऊन पोबारा करणे, बंद घर फोडणे तसेच उघड्या असलेल्या घरांतून बिनबोभाट चोरी करणे, हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. पोलिसांचा वचक नसल्यानेच अशा प्रकारांना ऊत येत आहे. खेड तालुक्यात चोरट्यांना शोधून काढण्यासाठी पोलीस तसदी का घेत नाहीत? याबाबत येथील नागरिकच संभ्रमात आहेत. फिर्याद लिहून घेणे आणि ती तपासाला देणे याच्यापुढे पोलिसांचा तपास जात नाही. एकंदरीत पोलिसांच्या कामगिरीला काहीअंशी मर्यादा आल्याचेच आता बोलले जात आहे.
भरदिवसा होत असलेल्या चोऱ्यांचा तपास लावणे शक्य असतानाच त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकात तर पोलीस ठेवणे आता अपरिहार्य झाले आहे. रोकड आणि दागिने चोरीचे प्रमाण बसस्थानकात वाढीस लागले आहेत. बसस्थानकात पोलीस कर्तव्यावर असूनही ते स्थानक परिसरात कधीच दिसत नाहीत. यामुळे अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक अशा सूचना किंवा नागरिकांची मते पोलिसांनी विचारात घेतली पाहिजेत. चोऱ्या होऊ नयेत, याकरिता रात्रीची गस्त घातली पाहिजे. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी आवश्यक अशा उपाययोजना करण्याकामी विचारमंथन करणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि कायमस्वरूपी पोलिसाची कर्तव्यावर नियुक्ती याखेरीज काही अन्य उपाययोजनांवर भर देणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police failure to make a thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.