दाखल्यांचा ढीगच्या ढीग
By Admin | Updated: August 26, 2015 23:17 IST2015-08-26T23:17:11+5:302015-08-26T23:17:11+5:30
तहसील कार्यालय : रत्नागिरीत पालकांची धावपळ

दाखल्यांचा ढीगच्या ढीग
रत्नागिरी : सध्या तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यांचे ढिगारे सहीसाठी साचू लागले आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडचणी येत आहेत. कागदपत्रे पूर्ण देऊनही केवळ सह्यांसाठी पालकांना महिने - दोन महिने खेटे मारावे लागत आहेत.दाखल्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नायब तहसीलदारांना ही जबाबदारी दिली आहे. यासाठी या नायब तहसीलदारांना ठराविक वार आणि महा ई-सेवा केंद्रे ठरवून देण्यात आली आहेत. येथील संजय गांधी योजना विभाग, निवडणूक शाखा, महसूल विभाग, पुरवठा विभाग यांचे नायब तहसीलदार तसेच निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, काही नायब तहसीलदार वगळता इतरांकडून या दाखल्यांची तपासणी वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येथील तहसीलदार कार्यालयात या कागदपत्रांचा ढिगारा पडला आहे. पावतीवरील तारीख उलटून महिना झाला, तरीही उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने पालकवर्गाला हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याअभावी शैक्षणिक कामे अडून राहिली आहेत.
शाळांनी उत्पन्नाचे दाखले सक्तीचे केल्याने या दाखल्यांसाठी पालकांची धावपळ होत आहे. मात्र, उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी त्यासाठी दोन-दोन दिवस लावत असल्याने दाखल्यांना विलंब होत असल्याचे दिसत आहे.
नागरिकांना आपल्या कागदपत्रांची शोधाशोध करून ती काढून घ्यावी लागत आहेत. काही वेळा नागरिकांची गैरसोय नको, म्हणून सहकार्याच्या भावनेने काही नायब तहसीलदार वार नसतानाही सह्या करून देत आहेत. निवासी नायब तहसिलदारांकडील दाखले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. याप्रकरणी तहसीलदार हेमंत साळवी यांनी लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
1अनेक शासकीय कार्यालये संगणकीकृत असूनही आता कामात उशीर होेत आहे.
2पूर्वी गाव पातळीवर उत्पन्नाचे दाखले वेळेवर मिळत होते. आता तेही उशिराने मिळत आहेत.
3उत्पन्नाचे दाखले बंधनकारक केल्याने ते मिळवताना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.