फिशमिलचे बांधकामाला आक्षेप

By Admin | Updated: October 21, 2015 21:29 IST2015-10-21T21:29:19+5:302015-10-21T21:29:19+5:30

रत्नागिरी : मांडवी पर्यटन विकास सेवा संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे

Phishmilk constable's objection | फिशमिलचे बांधकामाला आक्षेप

फिशमिलचे बांधकामाला आक्षेप

रत्नागिरी : पालिकेच्या मालकीचे भूखंड पालिकेला परत करण्याचे आदेश धुडकावून मांडवी पेठकिल्ला भागात रफीक नाईक यांचे ५०० टन क्षमतेच्या फिशमिल व खत निर्मितीच्या रासायनिक प्रकल्पाचे सुरू असलेले बांधकाम हे बेकायदा असून, ते तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या फिशमिलमुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होणार असून, याची वेळीच दखल घेण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रफीक नाईक यांच्याकडे रत्नागिरी नगर परिषद मालकीचे भूखंड क्र. ४४ ते ४८ भाडेतत्वावर होते. पालिकेसोबत असलेल्या कराराप्रमाणे त्यांनी विहित मुदतीत भूखंडावर कोणतेही बांधकाम केले नाही. त्यामुळे त्यांनी कराराचा भंग केला आहे. परिणामी रत्नागिरी नगर परिषदेने २६ डिसेंबर २०१४ रोजी सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे २०६, २०७, २०८, २०९ क्रमांकाने नोटीस देऊन १५ दिवसांच्या मुदतीत भूखंड नगर परिषदेच्या ताब्यात परत देण्याचे आदेश दिले होते.
या मुदतीत नाईक यांनी भूखंड नगर परिषदेला परत न करता रफीक नाईक एक्सपोर्टस प्रा. लि. या आपल्या कंपनीला ४ जुलै २०१४ रोजी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हस्तांतरीत केला. हे हस्तांतरण पालिकेच्या भाडेकराराविरुध्द व करारातील अटी, शर्तींचा भंग करणारे आहे. कारण भाडेकरारानुसार हा भूखंड कोणत्याही व्यक्तीला, भागीदारी संस्थेला किंवा खासगी कंपनीला हस्तांतरीत करता येणार नाही. या अटींचे उल्लंघन करून नाईक यांनी हा भूखंड खासगी कंपनीला हस्तांतरीत केला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेने या फिशमिलचे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस २० आॅगस्ट २०१५ रोजी रफीक नाईक यांना बजावली. या बांधकामासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच नगररचनाकार, रत्नागिरी यांच्या कार्यालयातूनही आवश्यक असलेल्या परवानग्या घेतलेल्या नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. दाट लोकवस्तीत आरोग्याला हानीकारक असा हा प्रदूषणकारी प्रकल्प नागरिकांना नको आहे. त्यामुळे पर्यटनावरही याचा परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Phishmilk constable's objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.