पर्ससीन मासेमारी अजूनही मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:07+5:302021-09-13T04:30:07+5:30
रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी सुरू होऊन ११ दिवस उलटल्यानंतर पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गेले चार दिवस मासेमारी ठप्प ...

पर्ससीन मासेमारी अजूनही मुहूर्त मिळेना
रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी सुरू होऊन ११ दिवस उलटल्यानंतर पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गेले चार दिवस मासेमारी ठप्प आहे. हंगामाला सुरुवात झाल्यानंतर ५० टक्के मासेमारी सुरू झाली होती. मात्र, मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. कोरोनामुळे गतवर्षीचा हंगाम वाया गेला. चालू हंगाम तरी व्यवस्थित जावा, अशी मच्छीमारांची आपेक्षा आहे.
जिल्ह्यात पर्ससीन नेटद्वारे होणारी उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. जिल्ह्यात २७९ पर्ससीन नौका आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर या चारच महिन्यांचा हंगाम शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे या मासेमारीला मिळतो. मात्र, गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे ही मासेमारी बंद होती. यावेळी दुसरी लाट आटोक्यात आल्यामुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून, १ सप्टेंबरपासून पर्ससीने नेट मासेमारीचा हंगाम सुरू झाला हाता. पर्ससीन नेटधारकांनी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती. बेळगांव, कर्नाटक, नेपाळ व स्थानिक खलाशांंना घेऊन मासेमारी सुरू केली होती. मात्र, मच्छीमारांसमोर पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे या हंगामाला अजूनही मनाप्रमाणे मुहूर्त मिळालेला नाही.
मासेमारी सुरू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसच मासेमारीसाठी अनुकूल वातावरण होते. त्यामुळे ५० टक्के पर्ससीन नेटधारक मासेमारीसाठी समुद्रात जात होते, परंतु त्यांनाही अपेक्षित मासे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. ज्या काही नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या, त्यांना गेदर व अन्य कमी दर्जाचे माशांवर समाधान मानावे लागले होते. सुरमई, पापलेट, सरंगा हे दर्जेदार मासे अपेक्षेप्रमाणे अजूनही सापडत नाहीत. त्याचबरोबर, गेले चार दिवस सुरू असलेला पाऊस आणि वादळी वारे यामुळे संपूर्ण मासेमारीच ठप्प आहे. त्यामुळे मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.