बारमाही पाण्याचा जलस्रोत महामार्ग कामामुळे दूषित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:19+5:302021-04-25T04:31:19+5:30
खेड : पुलासाठी लागणारे गर्डर तयार करण्याकरिता महामार्गाच्या ठेकेदाराने जगबुडी नदीपात्राचाच वापर केला आहे. या कामात लागणाऱ्या सिमेंटमुळे पिण्याच्या ...

बारमाही पाण्याचा जलस्रोत महामार्ग कामामुळे दूषित?
खेड : पुलासाठी लागणारे गर्डर तयार करण्याकरिता महामार्गाच्या ठेकेदाराने जगबुडी नदीपात्राचाच वापर केला आहे. या कामात लागणाऱ्या सिमेंटमुळे पिण्याच्या पाण्याचा बारमाही जलस्रोत खराब होण्याची भीती आहे.
कोणत्याही व्यावसायिक कामासाठी नदी पात्रातील जागा वापरता येत नसतानाही पुलाचा ठेकेदार मात्र थेट नदीपात्रातच गर्डर तयार करीत आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील भरणे येथील पूल गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने चर्चेचा विषय बनला आहे. या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल व नव्याने बांधण्यात आलेला पूल हे दोन्ही पूल वादग्रस्त झाले आहेत. २०१३ साली ब्रिटिशकालीन पुलावरून महाकाली ट्रॅव्हलची आरामबस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या पुलाच्या जागी नवीन सुरक्षित पूल उभारण्याची मागणी सुरू झाली. चार वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर जगबुडी नदीवर नवीन पुलाला चालना मिळाली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण मंजूर झाले व जगबुडी नदीवर नवीन पुलाचे सुरू असलेले बांधकाम रखडले. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने पावसाळ्यात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जुन्या ठेकेदाराकडून हे काम काढून घेतले आणि महामार्ग चौपदरीकरण कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडे वर्ग केले. राजकीय दबाव व जनरेट्यात जगबुडी नदीवरील नवीन पूल सन २०१९ मध्ये वाहतुकीस खुला झाला. लॉकडाऊनमुळे महामार्ग चौपदरीकरण व दुसऱ्या पुलाचे बांधकाम रखडले होते. आता संबंधित ठेकेदाराने जगबुडी नदीवरील चौपदरीकरण कामातील दुसऱ्या पुलाच्या बांधकामाला गती दिली आहे. मात्र, हे काम करताना या ठेकेदाराने पुलाचे गर्डर थेट नदीपात्रातच तयार करून बसविण्यास सुरुवात केली आहे. याबाबत स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.
जगबुडी नदीपात्रात भरणे येथून पुढे वेरळ, भोस्ते, अलसुरे, शिव, कोंडिवली, आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या विहिरी आहेत. पुलाचे गर्डर बनविताना सिमेंट, काँक्रीट व रसायनांचा वापर केला जात असल्याने पात्रातील जलस्रोत दूषित होण्याची भीती आहे. नदीपात्रातील काही वनस्पतीही यात नष्ट झाल्या आहेत. या प्रकाराची जिल्हाधिकारी व संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.