परिवहन बंदमुळे होणार जनतेचे हाल
By Admin | Updated: April 28, 2015 23:47 IST2015-04-28T22:20:24+5:302015-04-28T23:47:05+5:30
सेफ्टी बिल : एस.टी., रिक्षा, टॅक्सी बंद

परिवहन बंदमुळे होणार जनतेचे हाल
रत्नागिरी : रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारित रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांनी दि. ३० एप्रिल रोजी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे देशभर परिवहन बंद राहणार आहे.नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्स्पोर्ट वर्क र्स आणि महाराष्ट्र परिवहन कामगार, अधिकारी व स्वयंरोजगारित चालक - मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंद पुकारण्यात आला आहे. एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या संस्थांची प्रवासी टप्पे वाहतुकीची मोनोपॉली या तरतुदीमुळे संपणार आहे. बसमार्ग राज्य शासन, महानगरपालिका ठरवणार आहे. राज्य शासन, महानगरपालिका बसमार्गाचे टेंडर काढणार आहे. एस. टी., बीएसटीला खासगी मालकांसोबत स्पर्धेत उतरुन बसमार्ग विकत घ्यावे लागणार आहेत. सहा आसनी, बारा आसनी गाड्यांना मुक्त परवाना देणार असल्याने पर्यायाने रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त होईल. वाहतूक परवाना नूतनीकरणाच्या वेळेस वैद्यकीय तपासणी, वाहन चालविण्याच्या परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. ज्या कंपनीचे वाहन असेल त्यांच्याकडूनच सुटे भाग खरेदी करावे लागणार आहेत. एक वर्षापासून चार वर्षांच्या कारावासासारख्या गंभीर शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.
या अन्यायकारक तरतुदीमुळे त्याचे परिणाम एस. टी., रिक्षा व टॅक्सी व्यवसायावर होणार आहेत. शिवाय एस. टी., बीएसटीसारख्या सार्वजनिक संस्थांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे. रिक्षा, टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होण्याची शक्यता आहे. यासाठी कामगार व अधिकारी, स्वयंरोजगारित एस. टी., बीएसटी रिक्षा, टॅक्सी वाचविण्यासाठी व प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट सेफ्टी बिलाच्या विरोधात चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बील २०१४ मधील अन्यायकारक तरतुदींविरोधात चक्का जाम आंदोलन.
देशभर परिवहन बंद राहणार.
परिवहन कर्मचारी, अधिकारी आणि स्वयंरोजगारीत रिक्षा, टॅक्सी चालक- मालक सहभागी होणार.
नागरिकांचे निष्कारण हाल होणार.