लस न मिळाल्याने रत्नागिरीत लोकांचा गोंधळच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:33 IST2021-05-12T04:33:02+5:302021-05-12T04:33:02+5:30
रत्नागिरी : कमी डोस आणि प्रचंड गर्दी यामुळे रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील रसीकरण केंद्रावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. ...

लस न मिळाल्याने रत्नागिरीत लोकांचा गोंधळच गोंधळ
रत्नागिरी : कमी डोस आणि प्रचंड गर्दी यामुळे रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील रसीकरण केंद्रावर मंगळवारी चांगलाच गोंधळ उडाला. जोरदार ढकलाढकली झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. जवळपास चारशे लोक येथे जमले हाेते आणि त्यातील २२० लोकांना लस मिळाल्याने हा गोंधळ झाला.
रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्र मिस्त्री हायस्कूल येथे हलविण्यात आले आहे. मंगळवारी येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती जाहीर झाली होती. हा डोस दुपारी दिला जाणार होता. सकाळच्या सत्रात कोविशिल्डचा डोस दिला जाणार होता. दुपारची वेळ देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकही सकाळपासूनच रांग लावून उभे होते. ज्यावेळी सकाळच्या सत्रात अपाॅइंटमेंट दिलेले लोक येऊ लागले. तेव्हापासूनच बारीकसारीक वाद सुरू झाले होते. दुपारी २नंतर गर्दी वाढली आणि तेव्हा मात्र जवळजवळ धक्काबुक्कीच झाली. त्यावेळी प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे लोक अधिकच संतापले.
उपलब्ध डोसच्या दुप्पट लोक या लसीकरण केंद्राबाहेर जमले होते. त्यामुळे खूप गोंधळ झाला. लोक आक्रमक झालेले पाहून लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अखेर पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
लोक ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी दुपार सत्रातील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना घरी जायला सांगितले. हे नागरिक ऐकायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.
ज्यांचा दुसरा डोस होता अशांनी व त्यांच्या नातेवाइकांनीही केंद्रावर गर्दी केली होती. या केंद्रावर कोव्हॅक्सिनचे डोसचे प्रमाण कमी होते व नागरिक अधिक होते व त्यामुळे तणाव निर्माण झाला. म्हणून पोलिसांनी दंगा नियंत्रण पथक बोलावले. तरीही नागरिकांमध्ये काही फरक पडला नाही.
डोस कमी असल्यामुळे अखेर आरोग्य पथकाने कूपन देण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे नागरिकांना हा निर्णय समजल्यावर त्यांनी गदारोळ करायला सुरूवात केली.
नागरिक शांत होत नसल्याने आरोग्य विभागाने पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली. गेटबाहेर असलेल्यांना कूपन देऊन आत पाठविले जाऊ लागले. आत गेल्यावरही नागरिकांची भूमिका सहकार्याची नव्हती. जितके डोस होते, तेवढी कूपन दिल्यानंतर उर्वरित लाेकांना घरी पाठविण्यात आले. त्यालाही लोक तयार नव्हते. मात्र डोसच नसल्याने अखेर लोक परतले. मात्र तोवर पोलीस यंत्रणेवर चांगलाच ताण आला.