प्रगतीसाठी लोकसहभाग गरजेचा

By Admin | Updated: July 6, 2016 00:33 IST2016-07-05T23:30:54+5:302016-07-06T00:33:20+5:30

इसहाक खतीब : स्वप्न सत्यात उतरले याचा मनस्वी आनंद

People need help for progress | प्रगतीसाठी लोकसहभाग गरजेचा

प्रगतीसाठी लोकसहभाग गरजेचा

राज्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत समृध्द शाळा ठरवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्तरावरून जोरदार अंमलबजावणी झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले आहे, तर नजीकच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्याचे नाव अग्रभागी असेल, असा दावा येथील गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा, असा खेड तालुक्याचा नावलौकीक आहे, त्या पार्श्वभूमीवर बाईत यांच्याशी साधलेला थेट संवाद...!


प्रश्न : खेडमध्ये शैक्षणिक वातावरण कसं आहे? विशेष करून जिल्हा परिषद शाळांची प्रगती कशी आहे?
उत्तर : तालुकाभरातील एकूण ३७४पैकी ३१८ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यातील ५० शाळा अध्ययन आणि अध्ययनाकरिता वैयक्तिक स्वरूपात आपण स्वत: दत्तक घेतल्या आहेत. तालुक्यातील ब श्रेणीतील शाळा अ श्रेणीमध्ये आणण्याच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. या शाळा १०० टक्के प्रगत होण्याच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे, तर सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत खेड तालुक्यातून ४३ लाख ५३ हजार रूपये जमा झाले असून, त्याद्वारे तालुक्यातील १८३ मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवला जात आहे.
प्रश्न : समृध्द शाळांसाठी काय प्रयत्न सुरु आहेत?
उत्तर : समृध्द शाळांसाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न करण्यात आले असून, त्यांना चांगले यश आले आहे. शिक्षण आयुक्तांनी खेड तालुक्याची दखल घेतली असून, त्यांनी नुकताच तालुक्याचा अहवाल मागवून घेतला आहे. यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या असून, जिल्हाभरात खेड तालुका ‘टॉप’वर असेल, यात शंका नाही. शाळांच्या या प्रगतीमागे लोकसहभागाचे गुपीत दडले आहे. लोकसहभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तालुकाभरात शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत फार मोठी प्रगती होताना दिसत आहे. शासनाच्या अहवालानुसार शैक्षणिक प्रगतीचा आलेख मोबाईल, डिजिटल स्कूल, आयएसओ मानांकन शाळा ज्ञानरचनावादी शाळा, तंत्रस्नेही अशा उपक्रमांनी उंचावत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. पण या प्रगतीमागे आता लोकसहभागाचे गुपीत लपले असून, प्राप्त मदतीमुळेच हे शक्य झाले आहे.
प्रश्न : शिक्षणात सध्या कोणते बदल झाले आहेत?
उत्तर : शक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असल्याचा अभिमान आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा १०० टक्के प्रगत होणार आहेत. यासाठी सर्वांनीच ध्यास घेतला आहे. खेड तालुक्यातील ३७४पैकी आता २६२ शाळा प्रगत झाल्या आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी सन २०१५-१६ या शैैक्षणिक वर्षापासून झाली.
प्रश्न : समृध्द शाळांच्या उभारणीसाठी कोणते प्रयत्न सुरु आहेत?
उत्तर : एबीएल व बाला हे दोन नवे उपक्रम कृतीद्वारे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांमध्ये उतरवले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समृध्द शाळांची उभारणी होताना यातून दिसून येत आहे. जसा रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे, तसा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका जिल्ह्यात क्रमांक एकचा ठरण्यासाठी सर्वांनीच बाजी लावली आहे. तालुक्यातील धामणदिवी गावातील पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा नं. १ आणि होडकाड गावातील दत्तवाडी येथील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा नं. १ या दोन शाळांनी आयएसओ-९००० हे मानांकन मिळवले आहे. आजही अनेक शाळा आयएसओ मानांकनाच्या प्रतीक्षेत आहेत, हे शिक्षक आणि लोकप्रतिनिधींच्या कामांचे यश म्हणावे लागेल.
प्रश्न : डिजीटल शाळांच्या प्रक्रियेत खेड तालुका कोठे आहे?
उत्तर : खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३७४ शाळा आहेत. या सर्वच शाळांचा डिजिटल होण्याकडे कल आहे. त्यातील ३१८ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामध्ये एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने ९१ शाळा, टॅबच्या सहाय्याने ४७ शाळा आणि संगणकाच्या सहायाने १७६ शाळा डिजिटल झाल्याची माहिती त्यांनी दिली. डिजिटलच्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात असून, प्रत्यक्ष ते कृतीत उतरवले जात आहे. याशिवाय शिक्षकांकडील अँड्राईड मोबाईलद्वारे ‘शैक्षणिक अ‍ॅप’च्या सहाय्याने अध्ययन केले जात आहे. या अध्ययन पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना लवकर आकलन होत असल्याने विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक व केंद्रप्रमुख विद्यार्थी घडवण्यासाठी चांगले काम करीत असून, उत्तम लोकसहभागामुळे शिक्षकांना बळ मिळत आहे. क्षेत्रीय अधिकारी आणि विस्तार अधिकारी आपापल्या प्रभागाचे काम चोखपणे करीत आहेत.
- श्रीकांत चाळके

Web Title: People need help for progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.