टेंभ्ये : ३० नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने अंशदान पेन्शन योजना लागू केली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अद्याप या योजनेचा श्रीगणेशा झालेला नाही. त्यामुळे अजून किती वर्षे अंशदान पेन्शन योजनेचे ‘भिजत घोंगडे’ राहणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.३० नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला प्रतिमहिना अंशदान भरावे लागणार आहे. हा शासन निर्णय होऊन जवळपास चार ते पाच वर्षे होऊनदेखील अद्याप या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. जिल्हास्तरावरुन संबंधित शिक्षकांची खाते नंबर काढण्यात आले आहेत. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून अंशदान जमा करण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याने प्रत्यक्षात खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली नाही. याबाबत न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची जवळपास ९ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर या सर्व कालावधीची रक्कम संबंधित उमेदवाराना खात्यात जमा करावी लागणार आहे. यामुळे याबाबतचा निर्णय लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे मत संबंधित कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. डिसेंबर २००५ पासून आजपर्यंतची रक्कम खात्यात एकरकमी जमा करणे या कर्मचाऱ्यांना अशक्य होणार आहे. या विलंबाचा मानसिक ताण संबंधित कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.या योजनेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आतापर्यंत अनेकवेळा माहिती मागवण्यात आली. परंतु, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत असे निर्णय होत नसल्याने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. (वार्ताहर)अंशदान पेन्शन योजनेसाठी आवश्यक असणारी खाती उघडण्याचे काम जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक शिक्षकांचे खाते क्रमांक मिळाले आहेत. परंतु, वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश न मिळाल्याने अंशदान रक्कम जमा करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. वरिष्ठ कार्यालयाचे आदेश प्राप्त होताच पुढील प्रक्रिया सुरु होईल.- राजेंद्र अहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.
पेन्शनचे घोंगडे भिजतच
By admin | Updated: April 1, 2015 00:15 IST