थिबाकालीन बुद्धविहारचा प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 00:03 IST2015-04-15T23:17:54+5:302015-04-16T00:03:12+5:30
सात वर्षांचा प्रश्न : बुद्धिस्ट सोसायटीकडून होणारी ३८ गुंठ्यांची मागणी दुर्लक्षित

थिबाकालीन बुद्धविहारचा प्रश्न प्रलंबित
रत्नागिरी : सध्याच्या उत्पादन शुल्क कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या थिबाकालीन बुद्धविहाराच्या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या येथील शाखेतर्फे गेल्या सात वर्षांपासून ३८ गुंठे जमिनीच्या मागणीला आजतागायत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. जागेचा प्रश्न अनिर्णित असल्याने या बुद्धविहाराची दुरवस्था होत आहे.
बुद्धपुजा करता यावी, या उद्देशाने सध्या ज्या जागेवर उत्पादन शुल्क कार्यालय आहे, त्याच्या शेजारी थिबा राजाने रत्नागिरीत छोटेसे विहार उभारले होते. थिबा राजानंतर हे बुद्धविहार उपेक्षितच राहिले होते. या ठिकाणी छोटीशी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. अतिशय कलाकुसरीने तयार केलेली ही मूर्ती छत नसल्याने उन्हाळा, पावसाळा सोसत या ठिकाणी उभी आहे. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती अशा दिवशी बौद्ध संघटनांच्या वतीने इथे कार्यक्रम होतात. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारला जातो. या ठिकाणी चांगल्या प्रकारे बुद्धविहार उभारता येईल, या उद्देशाने बुद्धिस्ट सोसायटीच्या येथील समितीने हे बुध्दविहार ताब्यात देण्याची मागणी केली होती, ती मान्यही झाली होती.
सध्या या शासकीय जागेत उत्पादन शुल्क कार्यालय आहे. त्यामुळे या जागेचा प्रश्न अडकून पडला आहे. मात्र, या बुद्धविहारासह आसपास असलेली ३८ गुंठे जमिनीची मागणी बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या येथील समितीने सातत्याने केली होती. मध्यंतरीच्या काळात यापैकी पंधरा गुंठे जमीन समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ही घोषणा २००८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, याला आता सात वर्षांचा कालावधी उलटला तरीही याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या जागेचा प्रश्न अजूनही धसास लागत नसल्याने थिबा राजाचे स्मारक असलेल्या या बुद्धविहाराचीही दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे समितीने आता पुन्हा जोरदार मागणी करण्यास सुरूवात केली आहे. आतातरी जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
या बुद्धविहाराची जागा आमच्या ताब्यात द्या, ही मागणी आम्ही गेल्या सात वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे करत आहोत. थिबाकालीन हे बुद्धविहार म्हणजे बौद्ध समाजाची अस्मिता आहे. समितीकडे ही जागा सुपूर्द केल्यास या जागेवर मोठी वास्तू उभी राहू शकेल. या ठिकाणी चांगले कार्यक्रम होऊ शकतील. यासाठी आम्ही आता पुन्हा पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.
एल. व्ही. पवार,
अध्यक्ष - दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, शाखा रत्नागिरी