पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाणलोटचा पर्याय : माळी
By Admin | Updated: August 9, 2014 00:39 IST2014-08-08T21:31:47+5:302014-08-09T00:39:05+5:30
सतर्क राहण्याचा इशारा : अनेक उपाययोजनांची आवश्यकता आता पुढे येतेय

पुनरावृत्ती टाळण्यासाठी पाणलोटचा पर्याय : माळी
चिपळूण : जलसंवर्धनासाठी पाणलोट विकास कार्यक्रम हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन मालदोलीचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माळी यांनी केले.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत झालेल्या जाणीव जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते बोलत होते. विकास सहयोग प्रतिष्ठान आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती, मालदोली यांच्या संयुक्त विद्यमाने मालदोली ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते म्हणाले की, गावामध्ये पाणलोट प्रकल्पाच्या निमित्ताने सुंदर असे वातावरण निर्माण झाले आहे. तरीदेखील भविष्याची पावले ओळखून आपणास निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अधिक सतर्क राहावे लागणार आहे. लोकांनी निसर्गाच्या चक्रात अतिरेकी हस्तक्षेप केला, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे माळीण गावच्या दुर्घटनेने देशाने अनुभवले आहे.या कार्यक्रमात विकास सहयोग प्रतिष्ठानचे विभागीय समन्वयक विजय कदम प्रमुख मार्गदर्शक होते. ते म्हणाले की, जमीन, पाणी व पर्यावरण संवर्धनाची कामे तडीस नेताना या गावातील सर्व समाज घटकामध्ये चैतन्य निर्माण व्हावे, यासाठी आपणास काम करावे लागणार आहे. गावातील महिलांनी सकारात्मक पुढाकार घेतला, तर हा प्रकल्प निश्चितपणे आपल्या गावाकडे जगाचे लक्ष वेधू शकतो, एवढी ताकद आणि नियोजन या प्रकल्पामध्ये आहे.यावेळी लांजा येथील शाहीर काशीराम जाधव यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून पाणलोट विकास प्रकल्पाबद्दल गावातील ग्रामस्थांमध्ये जागृती केली. या सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)