टँकरच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:49+5:302021-06-03T04:22:49+5:30
आवाशी : टँकर मागे घेत असताना त्याची धडक बसून पादचारी ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता मुंबई - ...

टँकरच्या धडकेत पादचारी ठार
आवाशी : टँकर मागे घेत असताना त्याची धडक बसून पादचारी ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी फाटा येथे घडली.
या अपघातातील मृताचे नाव अभिजीत पवार (रा. चिंचवली, खेड) असल्याचे त्याच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या दिशेने लोटे आवाशी येथील हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीत कच्चा माल घेऊन येणारा टँकर (जीजे १२ बीडब्ल्यू ६७९२) हा कंपनीत वळण्याऐवजी पुढे आला. हे चालकाच्या लक्षात आल्याने तो पुन्हा आहे त्याच मार्गावरुन मागे जाण्यासाठी निघाला. यावेळी क्लिनर नसल्याने चालकाने त्याच्या एकाच बाजूला बघून वाहन मागे घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी लोटे येथून आवाशीकडे येणाऱ्या पादचाऱ्याला टँकरची जोरदार धडक बसली. यावेळी पादचारी रस्त्यावर पडून टँकर त्याच्या अंगावरुन गेला. यात त्या पादचाऱ्याच्या डोक्याचा व छातीच्या भागाचा चेंदामेंदा झाला व जागीच मृत्यू झाला.
या अपघातातील मृताचे नाव अभिजीत अ. पवार आहे. त्याच्या खिशात असणाऱ्या ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटली. तो चिंचवली-खेड येथील असून, तो आवाशी येथे भाड्याने राहत होता. हा अपघात दुपारी सव्वादोनच्या सुमारास झाल्यानंतर त्याची माहिती मोहानी येथील वाहतूकदार बंटी आंब्रे यांना मिळताच त्यांनी लोटे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, लोटे पोलीस खूप उशिराने घटनास्थळी दाखल झाले, असे अपघातस्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.