दापोलीतील आरोग्य यंत्रणा खेळतेय रूग्णांशी
By Admin | Updated: October 9, 2014 23:04 IST2014-10-09T22:24:35+5:302014-10-09T23:04:11+5:30
डॉक्टरांचा नवा फंडा : अत्यावश्यक सेवा शनिवार, रविवार पूर्ण दिवस बंद असल्याने रूग्णांचे हाल

दापोलीतील आरोग्य यंत्रणा खेळतेय रूग्णांशी
आंजर्ले : दापोलीतील आरोग्य यंत्रणा जीवघेणी बनली असून, डॉक्टर्समधील माणूसकीचा झरा आटू लागला आहे. रविवारी एखादा रुग्ण गंभीर झाल्यास, त्याला जीव गमावण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती आहे.
दापोली शहरातील हृदयविकारतज्ज्ञ हजर नसल्याने रुपनगर, दापोली येथील अशोक गोटे या शिक्षकाला प्राण गमवावा लागला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने उपचार होणे गरजचे असते. असे असताना तालुक्यात असलेले दोन्ही हृदयविकारतज्ज्ञ प्रत्येक शनिवार, रविवारी उपलब्ध नसतील तर रूग्णांनी काय करायचे? गेल्या दोन वर्षांपासून दापोलीतील काही खासगी डॉक्टरांनी एक नवा फंडा सुरू केला आहे. शनिवार, रविवार डॉक्टर अगदी मजेत पिकनिकला जातात.
काहींनी तर जमीन दलालीचा नवीन जोडधंदा सुरू केला आहे. या डॉक्टरांनी जमा केलेली माया डोळे दीपवणारी आहे. कुठल्या डॉक्टरने आपल्या व नातेवाईकांच्या नावे कुठे-कुठे जमिनी व प्लॅट घेतले आहेत. याची सखोल चौकशी सुरू केल्यास डॉक्टरांनी कमवलेली करोडोंची माया उघड होईल.
दापोलीकरांना आरोग्य यंत्रणेच्या कारभाराचा वारंवार फटका बसत असून, छोट्या-छोट्या आजारांसाठी व शल्यचिकित्सेसाठी मनमानी शुल्क आकारले जात आहे. आरोग्यसेवा ही २४ तास अत्यावश्यक सेवांमध्ये गणली जाते. मग दर शनिवार आणि रविवारी दापोलीतील खासगी डॉक्टर नेमके कुठे असतात? याची चौकशी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
दापोलीतील काही डॉक्टर्स अत्यंत प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देत आहेत. मात्र, त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकीच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. (वार्ताहर)
सुट्टीच्या दिवशी डॉक्टर्स पिकनिला
जमीन दलालीमध्येही काहींचा सहभाग.
उपचाराअभावी शिक्षकाने गमावला प्राण.