पावणे सोळा लाख खर्चाविना
By Admin | Updated: February 2, 2015 00:03 IST2015-02-01T22:46:50+5:302015-02-02T00:03:31+5:30
कृषी विभाग : भात मळणी यंत्राची आॅर्डर रद्द

पावणे सोळा लाख खर्चाविना
रत्नागिरी : शेतकऱ्यांना पारंपरिक पध्दतीने मळणी करण्यापेक्षा आधुनिक यंत्राव्दारे मळणी करता यावी, यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून १०५ मळणी यंत्राची आॅर्डर देण्यात आली होती. त्यासाठी १५ लाख ७५ हजाराचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र, मळणी यंत्राची अचानक आॅर्डर रद्द केल्यामुळे संबंधित अनुदान कृषी विभागाकडे पडून राहिले आहे.
भात मळणीसाठी अद्यापही पारंपरिक पध्दत अवलंबण्यात येते. त्यासाठी, वेळही अधिक जातो व परिश्रमही अधिक घ्यावे लागतात. तसेच मजुरीचा खर्चही वाढतो. मात्र, आता यांत्रिक शेतीचा जमाना आला आहे. त्यामुळे शेतकरीही आता या यांत्रिक शेतीकडे वळू लागले आहेत. मळणी कमीत कमी वेळेत लवकर पूर्ण व्हावी, याकरिता अत्याधुनिक मळणी यंत्र अनुदानावर पुरवण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने १०५ यंत्राची आॅर्डर नोंदवली होती. संबंधित यंत्राची किमंत १८ हजार असून, शासकीय अनुदान म्हणून १५ हजार तर शेतकऱ्यांना केवळ तीन हजार भरायचे होते. अतिशय माफक दरात मळणी यंत्र उपलब्ध होणार असल्याने, जिल्हाभरातून १०५ यंत्रांची मागणी करण्यात आली होती. मळणी यंत्रणासाठी प्रत्येक १५ हजार प्रमाणे १५ लाख ७५ हजारांचे अनुदान जिल्ह्याच्या कृषी विभागास प्राप्त देखील झाले होते.
मात्र, अचानक कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित आॅर्डरच रद्द केल्यामुळे, शेतकरी मळणी यंत्रापासून वंचित तर राहिलेच; शिवाय त्यासाठी आलेले अनुदान अद्याप पडून आहे. वास्तविक गतवर्षीचा हंगाम आता संपला असल्याने, तरी यावर्षीच्या हंगामासाठीही मळणी यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु, पुढील हंगामासाठी मळणी यंत्राची आॅर्डर द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
वास्तविक शासन यांत्रिक शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. किंबहुना, शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजनादेखील राबवत आहे. परंतु, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकरी सुविधांपासून वंचित राहत आहे. (प्रतिनिधी)