‘पॅसेंजर’चा प्रवास दहा रुपयांनी महाग
By Admin | Updated: June 24, 2014 01:41 IST2014-06-24T01:30:24+5:302014-06-24T01:41:56+5:30
आरक्षित तिकिटासाठी आधी ८५ ऐवजी आता ९५ रुपये मोजावे लागणार

‘पॅसेंजर’चा प्रवास दहा रुपयांनी महाग
रत्नागिरी : रेल्वे प्रवासी भाड्यात १४.२ टक्के वाढ घोषित झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांच्या प्रवास भाड्यात येत्या २५ जूनपासून वाढ होत आहे. त्यामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजरने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता अधिक दहा रुपयांची चाट बसणार आहे. या गाडीचे साधारण बोगीचे प्रवासी भाडे आता ७० रुपयांवरून ८० रुपये झाले आहे, तर आरक्षित तिकिटासाठी आधी ८५ ऐवजी आता ९५ रुपये मोजावे लागणार आहेत. एक्स्प्रेस गाड्यांच्या दरात २0 ते ३५ रूपयांची वाढ झाली आहे.
रत्नागिरीतून दररोज पहाटे ५.३० वाजता सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रेल्वे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. ही रेल्वे दुपारी २.३० ते ३ वाजता दादरला पोहोचते, तर ३.३० ते ४ वाजता पुन्हा रत्नागिरीकडे निघते. रत्नागिरी ते मुंबई जाण्यासाठी एस. टी. बसच्या तिकीट दराच्या तुलनेत रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेचे दर काही पटीने कमी असल्याने सर्वसामान्यांसाठी ही पॅसेंजर रेल्वे ‘आधार’ ठरली आहे. रत्नागिरीहून मुंबईला एस. टी. बसने जाण्यासाठी साध्या रातराणी बसचे तिकीट ४४१ रुपये, तर निमआराम बसचे भाडे ५०७ रुपये आहे. या एका तिकिटाच्या रकमेत चारजणांचे कुटुंब रत्नागिरी-दादर पॅसेंजरने नवीन भाडेवाढीनंतरही मुंबईत जाऊ शकते, अशी स्थिती आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या व कोकणवासीयांना उपयुक्त ठरणाऱ्या अन्य गाड्यांच्या तिकीट दरातही वाढ होत आहे. सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्सप्रेसचे प्रवासी भाडे शयनयानसाठी ४० ते ४५ रुपयांनी वाढले आहे. या गाडीचे रत्नागिरी ते दादर शयनयान भाडे ३० रुपयांनी वाढले आहे, तर द्वितीय श्रेणीचे प्रवासभाडे १५ रुपयांनी महागले आहे. कोकणकन्या एक्सप्रेसचे रत्नागिरी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस शयनयान भाडे ३५ रुपयांनी वाढले असून, द्वितीय श्रेणीचे भाडे २० रुपयांनी महागले आहे. जनशताब्दी एक्सप्रेसचे रत्नागिरी ते दादरकरिता ए. सी.चेअर कार प्रवासी भाडे ९० रुपयांनी वाढले आहे, तर द्वितीय श्रेणी प्रवासभाडे ४५ रुपयांनी वाढले असून ते आता २१० रुपये झाले आहे. (प्रतिनिधी)