जिल्ह्यातील सर्व शाळा ‘बंद’त सहभागी

By Admin | Updated: January 14, 2015 00:42 IST2015-01-14T00:00:57+5:302015-01-14T00:42:34+5:30

दिवसभर ३८३ शाळा बंद.. चिपळुणातही शाळा बंद, मंडणगडात शिक्षकांचा मोर्चा

Participants in all schools 'band' in the district | जिल्ह्यातील सर्व शाळा ‘बंद’त सहभागी

जिल्ह्यातील सर्व शाळा ‘बंद’त सहभागी

रत्नागिरी : महाराष्ट्रातील शाळांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणक्षेत्र संघटना समन्वय समितीने आयोजित केलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये जिल्ह्यातील ३८३ शाळांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व संस्थानी शाळा बंद ठेवून तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांना, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे निवेदने दिली.
रत्नागिरी तालुका समन्वय समिती व जिल्हा समन्वय समितीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळपासूनच हजारो शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. उपस्थित शिक्षक समुदायाला शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव, कार्यालयीनमंत्री आनंद त्रिपाठी, अध्यापक संघाचे सी. एस. पाटील, सागर पाटील, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कदम, शिक्षकेतर संघटनेचे राम केळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष आनंद शेलार, कोकण विभागाचे रवींद्र इनामदार, रेखा इनामदार, संस्था प्रतिनिधी भागवत तसेच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विलास पाटणे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)


मंडणगड : तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार कविता जाधव यांनी प्रांगणाबाहेर यावे व मोर्चाला सामोरे जावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली़ मात्र तहसीलदारांनी समन्वय समितीच्या प्रतिनिधींना तहसील दालनात प्राचारण करून त्यांचे म्हणने ऐकून घेतले़
मंगळवारी सकाळी ११.३० वाजता डॉ़ बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या पटांगणातून महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीअंतर्गत मंडणगड तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शासनाने शिक्षण क्षेत्रात लागू केलेली धोरणे पूर्णत: शिक्षणविरोधी असल्याची टीका केली. त्यानंतर तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन देण्यात आले.(प्रतिनिधी)

चिपळूण : आपल्या विविध मागण्यांसाठी आज (मंगळवारी) चिपळूणमधील शिक्षकांनी आंदोलन केले. त्याला शिक्षक व शिक्षण संघटना यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
आपल्या विविध मागण्यांसाठी व दोन महिने वेतन न झाल्याने राज्यातील शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी चिपळूण तालुक्यातील सर्व शिक्षक शाळा बंद ठेवून युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मैदानावर दाखल झाले. तेथून विविध मागण्यांचे फलक व घोषणा देत सर्वजण तहसीलदार कार्यालयावर धडकले. तेथेही घोषणाबाजी केली. शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याने तालुक्यातील शाळा बंद होत्या.
त्यानंतर संस्था प्रतिनिधी संजय शिर्के, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी भारत घुले, आर. व्ही. जोशी, नारायण माळवे, रामचंद्र महाडिक, संदेश कोकाटे, संजय मानकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, ओंबासे, भाग्यश्री पवार, नलावडे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार वृषाली पाटील यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Participants in all schools 'band' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.