वाढत्या काेराेनामुळे परीक्षांबाबत पालकांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:53+5:302021-03-30T04:18:53+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत असून, जिल्ह्यातील काेराेना बाधितांचा आकडा १०,७७९ इतका झाला आहे. ...

Parents frightened about exams due to increasing carnage | वाढत्या काेराेनामुळे परीक्षांबाबत पालकांना धास्ती

वाढत्या काेराेनामुळे परीक्षांबाबत पालकांना धास्ती

रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत असून, जिल्ह्यातील काेराेना बाधितांचा आकडा १०,७७९ इतका झाला आहे. काेराेनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र ऑफलाइन घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. काेराेनाचा संसर्ग असाच वाढत राहिला, तर मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न आता पालकांना सतावत आहे.

गतवर्षी मार्चमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर दि.१५ मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. कोरोना रुग्णवाढीमुळे ऑनलाइन अध्यापन पद्धतीचा पर्याय निवडण्यात आला. पहिले शैक्षणिक वर्ष व त्या सत्रातील चाचणी व सहामाही परीक्षा ऑनलाइनच घेण्यात आल्या. नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. जिल्ह्यातील ४५४ शाळांपैकी ४११ शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. एकूण ८२,०६९ विद्यार्थी संख्येपैकी ४१,३८५ इतके विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.

पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग शासनाच्या परवानगीने दि. ५ फेब्रुवारीपासून सुरू झाले. जिल्ह्यातील २,१६२ शाळांपैकी १,७५० शाळा सुरू झाल्या. ७२,६६७ विद्यार्थी संख्येपैकी ४०,१२८ विद्यार्थी उपस्थितीत राहत आहेत. पन्नास टक्के पालकांनी ऑफलाइनऐवजी ऑनलाइनचाच पर्याय निवडला.

जिल्ह्यातील काही शाळांमध्ये मात्र ऑनलाईन अध्यापन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना पाल्यांना शाळेत पाठवावे लागत आहे. त्यातच वार्षिक परीक्षा तोंडावर आहेत. काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नववी व अकरावीच्या वार्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगतच मुले शाळेत जात आहेत.

जिल्ह्यात महिनाभरात तब्बल ८०८ काेराेना बाधित रुग्ण सापडले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला केवळ १७ रुग्ण आढळले हाेते. मात्र त्यानंतर, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत गेली. २७ मार्च राेजी तर तब्बल ११६ काेराेना रुग्ण सापडले हाेते. त्यातच काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एका शाळेतील शिक्षक काेराेना बाधित आढळले हाेते. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली हाेती. एकीकडे काेराेनाचे रुग्ण वाढत असतानाच, विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरूच असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे शिक्षण विभाग मुलांच्या आराेग्याशी खेळत असल्याचा सूर उमटत आहे.

कोट

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोनामुळे वर्षभर ऑनलाइन अध्यापन झाले. पाचवी ते आठवीचे वर्ग फेब्रुवारीत सुरू करण्यात आले. आतापर्यंत शाळेतील अध्यापन रास्त होते. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने, वाढत असताना शाळा सुरू ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी? ऑनलाइनच वार्षिक परीक्षा घेणे शक्य असताना, नाहक मुलांच्या आरोग्याशी शासन खेळत आहे.

- कविता मोरे, पालक

कोट

शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त नाहीत, परंतु शाळा व्यवस्थापन समितीना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याबाबतचे अधिकार असल्याने, स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ शकतात, असे जरी शासनाकडून सूचित केले जात असले, तरी निर्णय घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. लहान मुलांच्या आरोग्याचा, सुरक्षेचा प्रश्न असल्याने विद्यार्थी हितार्थ योग्य व वेळेवर निर्णय घेणे गरजेचे आहे.

- रविकांत पाटील, पालक

Web Title: Parents frightened about exams due to increasing carnage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.