अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 02:26 PM2021-11-24T14:26:25+5:302021-11-24T14:28:03+5:30

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे ...

Parab will be pursued till he is expelled | अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

Next

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे सरकारने त्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत रिसॉर्ट पाडले जात नाही आणि परब यांची पदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आपण आपला पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिली.

ठाकरे सरकारने चार महिन्यांपूर्वी अनिल परब यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मग अजून कारवाई का होत नाही, याची माहिती घेण्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये आलो होतो. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेतली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत आहे. ते सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात आहे, त्यामुळे ते ताबडतोब तोडण्यात यावे, असे आदेश महाराष्ट्र कोस्टल झोन ॲथॉरिटीने चार महिन्यांपूर्वीच दिले आहेत. या रिसॉर्टसाठी देण्यात आलेला अकृषक परवाना बेकायदेशीर असल्याचे रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि राज्याचे महसूल सचिव यांनी लोकायुक्तांसमोरील सुनावणीमध्ये मान्य केले आहे. तो परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी या सुनावणीत सांगितले. आतापर्यंत याबाबत कार्यवाही झाली नसल्याने आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितले आहे, असे सोमय्या म्हणाले.

अनिल परब यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये २०१९/२० या वर्षाची आणि डिसेंबर २०२० मध्ये २०२०/२०२१ या आर्थित वर्षाची घरपट्टी स्वत:च्या नावाच्या बँक खात्यातून भरली आहे. रिसॉर्टसाठी लागणारी ३ फेज विद्युत जोडणी अनिल परब यांनीच मार्च २०२० मध्ये घेतली आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे मान्य करून ते पाडण्याचे आदेश देण्याचेही राज्य सरकारने कबूल केले आहे. मात्र अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. ७ डिसेंबरला लोकायुक्तांकडे पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यावेळी आपण हा विषय तेथे मांडणार असल्याचे ते म्हणाले.

लोक मरत हाेते, हे रिसॉर्ट बांधत होते

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हा लोक मरत होते, तेव्हा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधत होते, असा आरोप सोमय्या यांनी केला. त्यामुळेच आपण हा घोटाळेबाजपणा उघड केला आहे. आता परब यांची हकालपट्टी होईपर्यंत आपला याबाबतचा पाठपुरावा सुरूच राहील, असे सोमय्या यांनी सांगितले.

अलिबाबा आणि ४० चोर

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अलिबाबा आणि चाळीस चोर असा वारंवार आरोप करून सोमय्या यांनी आपण आतापर्यंत २८ जण उघड केले असल्याचे सांगितले. आता आणखाी १२ जण बाकी आहेत. अनिल परब हे उजवा हात असल्याने मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पुढचा निशाणा अर्जुन खोतकर

आता सोमय्या यांच्या निशाण्यावर कोण आहे, असा प्रश्न करण्यात आला असता, ते म्हणाले की, आता अर्जुन खोतकर यांच्याबाबतच्या तक्रारीचा पाठपुरावा आपण करणार आहोत. रूपाली विश्वास नांगरे-पाटील यांचाही त्यात सहभाग असून, सगळ्या गोष्टी लवकरच उघड होतील, असे ते म्हणाले.

Web Title: Parab will be pursued till he is expelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.