पोफळी ग्रामपंचायत समविचारी पॅनलकडे
By Admin | Updated: December 22, 2015 01:12 IST2015-12-22T01:11:39+5:302015-12-22T01:12:03+5:30
निकाल जाहीर : तेरापैकी अकरा जागा जिंकून गाव विकास पॅनेलला धोबीपछाड

पोफळी ग्रामपंचायत समविचारी पॅनलकडे
चिपळूण : पोफळी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी यांचे चिरंजीव विश्वनाथ ऊर्फ बाबू साळवी यांच्या समविचारी पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकून विरोधकांना धूळ चारली. चिपळूणच्या उपसभापती सुचिता सुवार यांचे पती सरपंच चंद्रकांत सुवार यांच्या पॅनलचे केवळ दोन उमेदवार निवडून आले. जनतेने दिलेला हा दहशतीविरुध्दचा कौल आहे. पाच वर्षात सर्वांना विश्वासात घेऊन काम करू, असा विश्वास साळवी यांनी व्यक्त केला.
पोफळी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी तहसीलदार वृषाली पाटील यांच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी विजय काणेकर यांनी सुरु केली. प्रभाग १ व २मध्ये समविचारी पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने साळवी गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. प्रभाग ३मधील दोन जागा सुवार यांच्या गावविकास पॅनलला मिळाल्या. परंतु, उर्वरित सर्व प्रभागात समविचारी पॅनलचे वर्चस्व राहिले. यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. निवडून आलेल्या उमेदवारांना उचलून घेऊन आनंद साजरा केला जात होता.
प्रभाग १मध्ये सर्वसाधारण गटात अब्दुल अली सय्यद ५६१ (विजयी), अब्बास ईसा सय्यद २९६, नोटा १८ असे ८७५ मतदान झाले होते. अनुसूचित जाती स्त्री या गटात अपूर्वा अरुण मोहिते ५६० (विजयी), दीप्ती दिलीप मोहिते २९२, नोटा २३, सर्वसाधारण स्त्री गटात जयबून मुबारक सय्यद ५२६ (विजयी), नेहा श्रीराम पवार ३१७, नोटा ३२, प्रभाग २मध्ये ८०६ मतदान झाले होते. सर्वसाधारण गटात विश्वनाथ बाळकृष्ण साळवी ६८८ (विजयी), संतोष गोविंद पंडव १०९, नोटा ९, दीपिका दीपक पंडव ६७७ (विजयी), लक्ष्मी लक्ष्मण पानगले ११४, नोटा १५, सर्वसाधारण स्त्री गटात स्नेहा अभिषेक साळवी ६५० (विजयी), शेख सुरय्या अहमद १४२, नोटा १४, प्रभाग ३मध्ये सर्वसाधारण २ जागांसाठी भिमराव तुकाराम बामणे ४२८ (विजयी), वैभव दिलीप पवार ४१७, चंद्रकांत जयराम सुवार ४९१ (विजयी), संजय राजाराम बामणे ३९१, नोटा ३, ना. मा. प्र. स्त्री अर्चना महादेव चव्हाण ४४२ (विजयी), अनुश्री अनिल पंडव ४१४, नोटा ९, प्रभाग क्र.४ मध्ये २६७ मतदान झाले. दर्शन दीपक कांगणे १३४ (विजयी), दीपक अर्जुन कांगणे १३२, नोटा १, सर्वसाधारण स्त्री तेजस्वी विजय मानकर १४५ (विजयी), सुनीता भीमराव बामणे ११६, नोटा ६, प्रभाग क्र. ५ मध्ये ३८३ मतदान झाले. ना. मा. प्र. दगडू बाबु शेळके १८८ (विजयी), बबन बाबू खरात १७१, नोटा २४, सर्वसाधारण स्त्री प्राजक्ता अभिजीत साळवी २०६ (विजयी), शिल्पा संजय सुवार १५८, नोटा १९ अशी मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी काणेकर यांनी निकाल जाहीर केला. सर्व विजयी उमेदवारांनी राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात जाऊन नेत्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, सभापती स्नेहा मेस्त्री, युवक अध्यक्ष मयुर खेतले, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, विनोद भुरण, सुनील मेस्त्री, संभाजी मानकर, महादेव चव्हाण, अली खान सय्यद, उस्मान सय्यद, वामनराव पवार, मिलिंद शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
विजयाचा आनंद व्यक्त करताना पॅनलचे प्रमुख विश्वनाथ ऊर्फ बाबू साळवी यांनी हा जनतेने दहशतीविरोधात दिलेला कौल आहे. स्वार्थासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरल्याने जनतेने त्यांना नाकारले. आमचे पॅनल निवडून आले याचा आनंद आहेच. पण माझे सहकारी वैभव पवार व संजय बामणे यांचा पराभव झाल्याचे शल्य अधिक आहे. त्यामुळे एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत, असे सांगितले. बाबू साळवी हे सर्वाधिक ६८८ मते घेऊन विजयी झाले.